मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; युवक गंभीर जखमी
सावली हॉटेलजवळ दुपारी घडला अपघात; दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी
बांदा
मुंबई–गोवा महामार्गावर सावली हॉटेलजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखमींची प्रकृती लक्षात घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.
