You are currently viewing जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गने साजरा केला जागतिक महिला दिन

जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गने साजरा केला जागतिक महिला दिन

कुडाळ :

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळ व कोमसाप शाखा कुडाळ संयुक्त आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा ८ मार्च रोजी सायंकाळी ४.०० वा. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातील १७ कर्तृत्ववान महिलांचा संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, शाल, सन्मानचिन्ह, वृक्ष आणि ग्रंथ भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मंगेश मसके, उद्घाटक संपादिका, साहित्यिका मा.संजीवनी देसाई, प्रमुख अतिथी जिल्हा बँक संचालिका नीता राणे, प्रमुख पाहुण्या कादंबरीकार वृंदा कांबळी, ग्रंथमित्र तथा कार्यकारिणी कोषाध्यक्ष प्रा.अनंत वैद्य, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रा.संतोष वालावलकर, जिल्हा सचिव संतोष सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर (दीपी), कार्य.सदस्य संदीप वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवात राष्ट्रगीताने आणि महाराष्ट्र राज्यगीताने झाली. तद्नंतर कुडाळ तालुका सचिव सुरेश पवार यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.संतोष वालावलकर यांनी कोमसापचा महिलादिन साजरा करण्याबाबतचा उद्देश विशद करून कोमसापच्या वाटचालीवर भाष्य केलं. सन्मान सोहळ्याच्या सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.

कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात सर्वप्रथम कार्यक्रमाच्या उद्घाटक मान.संजीवनी देसाई यांचा सन्मान नीता राणे यांच्या हस्ते आणि नीता राणे यांचा सन्मान संजीवनी देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ व कुडाळ तालुका शाखेच्या वतीने निवड करण्यात आलेल्या १७ रणरागिणींचा सन्मान अनुक्रमे संजीवनी देसाई, नीता राणे, वृंदा कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. या सन्मानार्थींमध्ये प्रामुख्याने ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली अशा १७ महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कुडाळ महिला रुग्णालयाच्या डॉ.गायत्री पालयेकर मान.वर्षा वैद्य, १०० हून जास्त गड किल्ले सर केलेली सौ. नुपूर मठकर, तरुण भारत पत्रकार अनुजा कुडतरकर, मा.स्वाती वालावलकर, मा.रिया शिवगण, मा. साधना माडये, मा. प्रतीक्षा बागायतकर, मा. प्रिया राजन पांचाळ, मा.पल्लवी पंढरीनाथ सावंत, मा. सरिता बबलू पिंगुळकर, मा. प्रणया प्रवीण धुरी, मा. मनीषा धोंडी मसके, मा.साक्षी भालचंद्र धुरी, मा. साक्षी रविकिरण कविटकर आदी सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतात डॉ.गायत्री पालयेकर यांनी महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा मूलमंत्र दिला. मा.वर्षा वैद्य यांनी देखील आपल्या मनोगतात स्त्रियांच्या प्रश्नांवर भाष्य केलं. मा.स्वाती वालावलकर यांनी सुंदर काव्यरचना सादर करत मनोगत व्यक्त केलं तर मा.साधना माडये यांनी बचतगटाच्या माध्यमातून कसं कार्य करता येतं याबद्दल माहिती दिली. उपस्थित सर्वच सत्कारमूर्तींनी कोकण मराठी साहित्य परिषदेने केलेल्या सन्मानासाठी संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नीता राणे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून बचतगटांसाठी दिली जाणारी कर्ज, योजना आदींबाबत माहिती देत मधुभाईंसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. वृंदा कांबळी यांनी देखील आपल्या मनोगतातून वेगवेगळी उदाहरणे देत स्त्रियांना योग्य मार्गदर्शन केले. उद्घाटक मा.संजीवनी देसाई यांनी देखील स्त्रियांना उत्तम असे मार्गदर्शन केले. अध्यक्ष श्री मंगेश मसके यांनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याच्या संस्थेच्या सूचनांची अंमलबजावणी करताना अल्पावधीत कुडाळ शाखेने केलेल्या आयोजनासाठी सुरेश पवार, संतोष वालावलकर, गोविंद पवार आदींचे कौतुक केले. सर्व सन्माननीय सत्कारमूर्तींचे कार्य त्यांनी थोडक्यात विशद करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा सचिव श्री.संतोष सावंत यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन सावंतवाडीचे राहुल कदम यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी कवी विठ्ठल कदम, श्री गावडे सर, श्री.मर्गज, श्रीम.पाताडे मॅडम, सौ. मसके, कुमारी मसके, प्रदीप केळुसकर, कुडाळ शाखेचे सदस्य आदी अनेक साहित्यिक उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा