*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या*
वयाच्या १५ व्या वर्षापासून माझे वडील चळवळीत होते.गांधींचे भाषण ऐकले व
ऐन विद्यार्थी दशेतच पत्रके वाटण्यापासून
त्यांनी चळवळीचे काम स्वीकारले. त्या लहान
वयात जे काम समोर येईल ते देशाचे काम म्हणून ते करत राहिले व हळूहळू पूर्ण धुळे
जिल्ह्याचे क्रांतीचे नेतृत्व त्यांच्याकडे आले.
योग्य वेळी लग्न होऊन माझी आईपण क्रांतीत
ओढली गेली व ब्रिटिश सरकार विरोधी कारवायात वडीलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी
राहिली. ब्रिटिशांचा ससेमिरा सोसत देशभर त्यांची
पळापळ झाली. संसार कसला? कागदावर जेवून
रातोरात चारघरे बदलावी लागत. गल्ली ते दिल्ली
अशी त्यांची फरपट, चांदा ते बांदा अशी चालू
होती. वडिलांना तुरुंगवास झाला. मुले माहेरी ठेवून वडिलांबरोबर देशभर पळत होती.
संसाराची ही वाताहत तिने कशी सावरली असेल
ते ही साधनशुचितेचा अभाव असतांना? मी म्हणते देशासाठी तिने केलेला हा त्याग पराक्रमच
नाही का? गावी स्थिर झाल्यावर भांडीकुंडी सुद्धा
नव्हती. शून्यातून विश्व उभे केले तिने. तिच्या कष्टांना सीमा नव्हती.मी लहान असतांना गावी
स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही सारे झोपल्यावर
आमच्या उशाशी बसून तिची भरडकी सुरु व्हायची ती उशिरापर्यंत चालायची. डाळी घरीच
बनत असत ना? पहाटे पायली पायली दळायला
उठावे लागे. गिरण्या नव्हत्या.लगेच पाच वाजता
उठून चूल पेटवून, सडासारवण करत असे. तोवर
पाणी तापायचे.शेतातून आलेल्या सर्व धान्याची
निगराणी, डाळीसाळी, उन्हाळ्याचे वर्षभराचे वाळवण, अबबबबब..? तिच्या कामांची यादी
२४ तासांपेक्षा जास्तच होती. अखंड कामाचा
धगधगता यज्ञच जणू.. पण, खिजगणतीत?
कुणाच्याही नाही. कारण घरोघर तेच होते ना?
समाजाने स्त्रियांना इतके गृहित धरले की, दिवस
रात्र घरोघर कष्टणाऱ्या या महिलांच्या कामाचे
पैशात मोल केले तर पैशांचे डोंगर उभे राहतील
यात शंकाच नाही. या महिला अत्यंत बुद्धिमान
होत्या फक्त त्यांना शिकायची संधी मिळाली नाही किंबहुना जाणीवपूर्वक ती नाकारली गेली.
नाहीतर एखाद्या शास्रज्ञापेक्षा त्या कमी नव्हत्या.
बघा ना, सुधा मुर्तींनी झगडून संधी मिळवली व
आज त्यांचे साम्राज्य आपण बघतो आहोत.
अहिल्या बाईंनी, झाशीच्या राणीने अपार कष्ट
केले. तशी संधी त्या काळी इतर महिलांना न मिळता त्यांची बुद्धी दडपली जाऊन त्या आनंदीबाई बनल्या. बुद्धी तीच पण वाममार्गाला
लागली ना? घरोघर आपल्या कुटुंबातही घर
चालवणाऱ्या धैर्यवान महिला होत्याच ना?
रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, डॅा. रखमाबाई
अशा अनेक कर्तृत्ववान महिलांनी शून्यातूनच
पण विपरीत परिस्थितीवर मात करत धाडसाने
आपले काम चालू ठेवले. सावित्री व जोतिराव
यांची तर गोष्टच अफाट आहे, शब्दांच्या पलिकडची. तसे धाडस आजही कुणी करू शकत नाही.
खेड्यात रहात होते म्हणून, दररोज रोजंदारीवर
शेतावर कामाला जाणाऱ्या महिलांना मी जवळून
पहात होते. नवरा बायको दोघे कष्टत होते हे खरे
असले तरी मुलाबाळांचे काय? हा महिलांवर अतिरिक्त भार असतांना? ती बरोबरीने रोजंदारीला जात असे. थकलाभागला पुरुष आरामात खाटेवर पहुडला असतांना ही लेकरे
व चुलीशी झटत सर्वांच्या पोटासाठी धुरात डोळे
फोडत सर्वांच्या पोटाची आग शांत करत असे.
भांडीकुंडी घासून अंग टाकत नाही तोवर दळण
कांडण करून सकाळच्या न्यहारीची तयारी,
मुलांचे आवरून धुणे डोक्यावर घेऊन चालली
नदीवर कपडे धुवायला. घरी येताच नवऱ्याची
भाकरी बांधायची व स्वत:ची भाकरी बांधून चालली फुफाटा उडवत शेतावर कामाला. एक
मिनिटं म्हणाल तर उसंत नाही हो! काटक्या गोळा करत डोक्यावर मोळी घेऊन भिडायचे नि
पुन्हा चुलीशी झट्या सुरू! सांगा ना, विश्रांतीचे
पांखरू कुठे भिरभिरत होते हो?
काही जणी तर शेतातून आल्या आल्या गिरण्या
आल्यानंतर गिरणीतच सुप घेऊन धान्य तिथेच
पाखडून दळण घेऊन घरी जात. कुणी पुरुष मला दळण नेतांना दिसला नाही. महिला नाहीतर
मुलीच. कामांची अशी काही विषम वाटणी अजूनही आहे की, तरीही अंगवळणी पडल्याने महिला घरोघर कष्टत आहेत व कष्टत राहतील
कारण समाजाने ते इतके पचवले आहे की त्यात
नवल ते काय असेच साऱ्यांना वाटते. जावे त्याच्या वंशा कळे हेच खरे पण जाते कोण?
माझ्या मते प्रत्येकच महिला शून्यातून विश्व
निर्माण करणारी आहे मग ती कोणत्याही वर्गातील असो. कष्ट तिच्या नशिबाला कधीच
चुकले नाहीत हेच खरे व चुकणार नाहीत हे ही
खरे.माझ्या दारासमोरून रोज कचरा वेचत घरी
जाणारी महिलाही याला अपवाद नाही.
आता जमाना बदलतो आहे व नव्या पायवाटा
निर्माण होऊ पहात आहेत. हे नवे वारे या संसाररूपी गाड्याला कुठे घेऊन जाणार आहेत
या विषयी मी मात्र सचिंत आहे. चित्रं अजून धुसर
आहे. बघू या काय होते ते.
सर्व महिलांना साष्टांग प्रणिपात.
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
