You are currently viewing आधुनिक द्रोणाचार्य महादेव जगताप 

आधुनिक द्रोणाचार्य महादेव जगताप 

एका निमशासकीय प्रशिक्षण संस्थेतून नव विद्यार्थ्यांना आयएएस घडविणाऱ्या एका ध्येयवेड्या संचालकांची यशोगाथा..

 

आधुनिक द्रोणाचार्य महादेव जगताप 

 

ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक मा. श्री महादेव जगताप यांनी नवा विक्रम स्थापन केला आहे. नुकत्याच काल परवा लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेत त्यांनी चक्क नऊ मुलांना उत्तीर्ण करून दाखवून महाराष्ट्रासमोर नव्हे देशासमोर एक आदर्श ठेवला आहे .विशेष म्हणजे निकाल लागण्याच्या एक दिवस आधी मी त्यांना भेटलो तर त्यांनी माझी आठ नऊ मुले उद्या लागणाऱ्या आयएएसच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार आहेत असे ठामपणे सांगितले होते .हे ठामपणे सांगण्यामागे त्यांची तपश्चर्या होती हे वेगळे सांगणे न लगे.

 

एखाद्या निम शासकीय संस्थेतून नऊ मुले आयएएस होणे ही फार मोठी गोष्ट झाली. कारण खाजगी संस्था आणि शासकीय संस्था यामध्ये फरक असतो. तो फरक श्री महादेव जगताप यांनी भरून काढला आणि महाराष्ट्रा समोर एक आदर्श ठेवला.

अशाच एका कार्यक्रमांमध्ये श्री महादेव जगताप यांची भेट झाली होती .त्यांनी मला चिंतामणराव देशमुख आयएएस अकादमीमध्ये ठाण्याला येण्याचे निमंत्रण दिले होते. एक दहा वर्षांपूर्वी मी जेव्हा या संस्थेला भेट दिली होती तेव्हा या संस्थेची परिस्थिती चांगली नव्हती .पण काल जेव्हा मी या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये भेट दिली तेव्हा मला अमुलाग्र बदल झालेला दिसला. मातीचे सोने झाले असा प्रकार दिसला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री महादेव जगताप यांचा लोकाभिमुख स्वभाव. अतिशय विनम्र पण ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारा संचालक या शब्दात त्यांचे मूल्यांकन करावे लागेल. सुरुवातीची चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्था आणि आताची संस्था यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडलेला आहे. संस्थेचा पूर्ण परिसर ग्रंथालय अभ्यासिका अतिथी कक्ष संचालक कक्ष ह्या खऱ्या अर्थाने बोलक्या व समृद्ध झालेल्या आहेत.

 

श्री महादेव जगताप यांचा अजून एक विशेष म्हणजे आम्ही ज्याप्रमाणे दुसऱ्या वर्गापासून आयएएसचे पुस्तके तयार केली त्याचप्रमाणे दुसऱ्या कोणी केली असेल असे मला वाटत नव्हते. पण काल जेव्हा मी या संस्थेला भेट दिली तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. जगताप सरांनी पुढाकार घेऊन पाचव्या वर्गापासून बारावीपर्यंतची सर्व एनसीआरटीची पुस्तके विद्यार्थीमुख बनविली आहेत. खरं म्हणजे हे अवघड काम असतं .चिकट काम असतं. त्रासदायक काम असतं. पण म्हणतात ना जितनेवाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग ढंगसे करते है या न्यायाने त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून ही पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत. आणि त्याचा दर देखील फार माफक आहे.

 

मुंबईला माझे कार्यक्रम ठरले होते . सर्वप्रथम मी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त व माझे अमरावतीकर मित्र श्री प्रशांत रोडे त्यांना भेटायला गेलो. माझ्याबरोबर माझे मित्र व जीवन संजीवनी चे संचालक श्री राजेश चव्हाण हे होते. त्यानंतर मी जगताप सरांना व्हाट्सअप वर मेसेज केला की मी मुंबईत आहे आपल्या संस्थेला भेट देणार आहे. त्यांच्या लगेच संदेश आला .आपले स्वागत आहे .

 

मी जेव्हा संस्थेमध्ये गेलो तेव्हा सरांना भेटायला दोन विधी महाविद्यालयाचे प्राचार्य आले होते. आमची खाजगी संस्था कशा कोचिंग करतात यावर चर्चा सुरू होते होती. त्या दोन प्राचार्यांनी त्यांची कशी फसवणूक झाली ते पण सांगितले. आम्ही जगताप सरांशी चर्चा सुरू केली. ते सांगत होते .एक एक धागा उलगडत होता .सर स्वतः आम्हाला संस्था दाखविण्यासाठी घेऊन गेले. प्रत्येक दालन हे आकर्षक नीटनेटके स्वच्छ व अभ्यासपूर्ण दिसले. सर्व मुले खऱ्या अर्थाने अभ्यासच करीत होती .एकही मुलगा अवांतर दिसला नाही.

ग्रंथालयाचा देखील कायापालट झालेला दिसला.ग्रंथालयामध्ये आयएएसला लागतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पुस्तके आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दिसली .त्यांची मांडणी नीट केलेली दिसली. कुठेही विस्कळीतपणा आढळला नाही.

 

आता या संस्थेच्या विस्तारासाठी सरांनी दोन कक्ष अजून करायचे ठरविले आहेत. त्याचे काम देखील सुरू झालेलेआम्हाला दिसले. सर आम्हाला तिथे असलेल्या अतिथी कक्षात घेऊन गेले .आम्ही आतमध्ये प्रवेश करताच तिथे असलेले सर्व प्रशिक्षक ताडकन उठून उभे राहिले .आयएएसला शिकविणारे तज्ञ मार्गदर्शक इतक्या पटकन उभे राहतात हा आम्हाला आश्चर्याचा धक्का होता. सरांनी सर्वांचा परिचय करून दिला .आम्ही कक्षात परत आलो .

 

सरांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे ती म्हणजे फाउंडेशन कोर्स. बारावीनंतर जी मुले स्पर्धा परीक्षेला जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी सरांनी फाउंडेशन कोर्स तयार केलेला आहे .बारावी झालेले मुले ते या फाउंडेशन कोर्सला प्रवेश घेऊ शकतात .हा अतिशय उत्तम उपक्रम आहे .आपल्याकडे मुले साधारणतः पदवी परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात आम्ही ती दुसऱ्या वर्गापासूनच केलेली आहे. पण ती प्राथमिक स्वरूपाची आहे .जगताप सरांनी मुलांमध्ये जिज्ञासा व त्यांनी जर बारावीपासून अभ्यासाला सुरुवात केली तर त्याला चांगले यश मिळू शकते हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून या फाउंडेशन कोर्सची आखणी केलेली आहे आणि हा उपक्रम खरोखरच अभिनंदन आणि अनुकरणीय आहे.

 

आमच्या सगळ्या कक्षांना भेटी देऊन झाल्या .ज्या ठिकाणी अतिथीची व्याख्याने होतात ते सभागृह देखील आम्ही पाहिले. अतिशय सुसज्ज ते दिसले. नुकत्याच त्या ठिकाणी सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्रीमती मोक्षदा पाटील ह्या मार्गदर्शनासाठी येऊन गेल्याचे कळले .आम्ही सरांच्या केबिनमध्ये परत आलो .सरांनी भला मोठा बुके व शाल माझ्यासाठी बोलावून ठेवले होते.

त्यांनी माझा चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून माझ्या मिशन आयएएस कार्याचा गौरव म्हणून माझा सत्कार केला. मला खरंच गहिवरून आलं. एका निमशासकीय आयएएस प्रशिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचा सत्कार होण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.

मी सरांचे आभार मानले व जायला निघालो तर सर मला व श्री राजेश चव्हाण यांना अगदी संस्थेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडायला आले. ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा संचालक आपली खुर्ची सोडून एखाद्या व्यक्तीला दारापर्यंत सोडायला येतो ही गोष्ट म्हणजे नमूद करण्यासारखी आहे. त्यातून जगतापसरांचे मोठेपण व आदरतिथ्य कसे असावे याचे दर्शन घडल्याशिवाय राहिले नाही. सरांनी माझ्यावर एक जबाबदारी पण टाकली .ते म्हणाले मोठ्या संख्येने आयएएस आयपीएस अधिकारी तुमच्या परिचयाचे आहेत. ते जर आमच्या संस्थेमध्ये येत राहिले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत राहिले तर या संस्थेच्या विकासाला सोन्याची झालर लागल्यासारखे होईल .मी लगेच माझे जिवलग मित्र व आयएएस अधिकारी श्री विशाल नरवाडे यांना फोन लावला. त्यांनी फोनवरच संमती दिली आणि लगेच येत असल्याचे कळविले. या सर्वांमधून सरांची तळमळ मला दिसून येत होती.

 

सर म्हणाले उद्या आयएएसचा निकाल लागणार आहे. माझी आठ नऊ मुलं उद्याच्या निकालात नक्कीच आयएएस झालेली असतील. त्यांच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास होता. या आत्मविश्वासाला त्यांच्या तपश्चर्याची जोड होती.

 

काल जेव्हा निकाल लागला तेव्हा त्यांनी किती ठामपणे सांगितलेली गोष्ट प्रत्यक्षात उतरली याचा मला प्रत्यय आला. खरोखरच नऊ मुले त्यांच्या संस्थेतून आयएएसची परीक्षा पास झाले होते. हा निकाल नक्कीच फार आशावादी आहे. मी प्रवासात होतो .मी सरांना फोन केला. अभिनंदन केले .सरांनी लगेच मला सर्व मुलांचे फोटो .त्यांचे मोबाईल नंबर पाठविले. मी प्रवासात असताना त्या मुलांशी संपर्क साधला .प्रत्येक मुलगा जगताप सरांचेच नाव घेत होता आणि कृतज्ञता व्यक्त करीत होता.

 

असे जगताप सर महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक शासकीय आयएएस सेंटरला लाभले तर मला वाटते महाराष्ट्राचा आयएएसचा जो निकाल उत्तरोत्तर वाढत आहे त्याला चार चाँद लागल्याशिवाय राहणार नाहीत. जगतापसर आपण ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसाठी जे वाहून घेतले आहे त्याला मनापासून हृदयापासून प्रणाम.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा