You are currently viewing मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला दापोलीत थांबा देण्याची मागणी

मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला दापोलीत थांबा देण्याची मागणी

हर्णे बंदराचा समावेश करण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन

मुंबई :

मुंबई ते कोकण प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत सुरू करण्यात आलेल्या मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. मंत्रालयातील मंत्री राणे यांच्या दालनात भेट घेऊन त्यांनी निवेदनाद्वारे ही मागणी मांडली.

मुंबई–तळकोकण रो-रो बोटसेवेचा शुभारंभ १ मार्च रोजी मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला. या नव्या जलप्रवासाला कोकणवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सेवेचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरालाही मिळावा, यासाठी हर्णे बंदर येथे रो-रो सेवेला थांबा देण्याची मागणी मंत्री कदम यांनी केली आहे.

मुंबई ते विजयदुर्ग अशी थेट सेवा असल्यामुळे सध्या दापोली परिसरातील प्रवाशांना या सुविधेचा थेट लाभ मिळत नाही. दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने प्रवाशांना सागरी मार्गावर अधिक अवलंबून राहावे लागते. त्यामुळे हर्णे बंदर येथे रो-रो सेवेला थांबा दिल्यास या भागातील सागरी दळणवळणाला चालना मिळेल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे मंत्री कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, हर्णे बंदर येथे सध्या जेट्टीचे बांधकाम सुरू असून भविष्यात या ठिकाणी रो-रो सेवेला थांबा देण्याची सुविधा निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीदरम्यान पदुमचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा