*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
भाग: ५३
*रोंबाट*
काकल्या सकाळीच आलेला. जरा शांत दिसत होता. मी त्याला तसे म्हटलेही. त्यावर उलट बोलत म्हणाला, “मी गप आसय, तर तुझ्या पोटात दुखता कित्याक? अरे ,आरड मारणा सोप्या, शांत रवणा कठीण. ता कठीण काम मी करहय. आणि याक, शिगम्यात सगळ्यानीच बोंब मारूक होई काय?”
मी म्हणालो, ” तसं काही नाही रे,सहज विचारलं”
त्याबरोबर काकल्या सरसावला. म्हणाला,” शिगम्याचा माका याक समाजणा नाय; तेतूर झाडा तोडतत, आरडी मारतत. रोंबाटात तर ह्या सगळ्याचो कहर आसता. बरा हेच्यार बोलला, तर धर्माभिमानी चाळावतत. झाडा वाचवची सोडच, दुसर्यागेर बकरे कापतत तेच्यार बोला हुंतत.”
“ते त्यांच चूकच. प्रथम सुधारणा करायची ती आपल्यात. इतरातील दोष त्या त्या पंथातील चांगली माणसे दाखवतील. ”
“मगे माका याक सांग. ह्या रोंबटाचो उद्देश काय? तेच्यात्सून धर्म, परंपरा कित्याक आणि कशी जिती रवतली? ” काकल्याने प्रश्न टाकलाच.
शिमग्यात आमचेकडे लोक रोंबाट काढतात. ढोल बडवत, ओरडत, रस्त्यावरून होळीकडे जातात. दारू पिऊन झिंगतात. कशाचा कशाला धरबंद नसतो. म्हणूनच आम्ही कधी गोंधळ, अस्ताव्यस्तपणा पाहीला की, ‘हयता तुझा रोंबाट आदी आवर’ असं म्हणतो.
“तुझं काय मत?” मी सोयीस्कर बाजू निवडून काकल्याला बोलतं केलं.
“मियाच सांगू? अरे, आपल्या धर्माकडे, परंपरेकडे बारीक नजरेन बघूक होया. रोंबाट मारून जी आरड मारूची ताकद कमायतास मां, ती समाजातल्या चुकीच्या गोष्टीर बोलाक वापरूक होयी. जा बोलणा गरजेचा आसता, पून वरासभर बोला शकाक नाय; ता रोंबाटावक्ता बोला मरे. गावातल्या भ्रष्टाचारी मानसाक , सोरो खाणार्याक, जुगारड्याक गाळी घाला. जा जा चुकीचा, तेच्यार तोंडसुख घेया मरे. अशीय परंपरा जपा शकता, नायतर निर्माण करा. फुक्कट रोंबाट काय कामाचा?” निघताना मला म्हणाला,”बरा, सातया दिसा गावचा रोंबाट आसा. गावातल्या घाणीर गुंडो मारया, हुंजे आरड मारया. आसा हिम्मत तर ये.”
मला भलतेच निमंत्रण देऊन काकल्या चालू पडला.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
