You are currently viewing कोलगाव पाणीप्रश्नावर सकारात्मक तोडगा; रखडलेली योजना लवकरच मार्गी
Oplus_16908288

कोलगाव पाणीप्रश्नावर सकारात्मक तोडगा; रखडलेली योजना लवकरच मार्गी

प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांच्या बैठकीत सामंजस्य; कायदेशीर करार करून काम गतीमान करण्याचा निर्णय

सावंतवाडी :

कोलगाव ग्रामस्थांच्या प्रलंबित पाणीप्रश्नाबाबत आज नगर परिषद प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांच्या शिष्टमंडळात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत रखडलेल्या पाणी योजनेचे काम कायदेशीर करार करून तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

सुमारे १.५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पाळणे कोंड धरण प्रकल्पातून कोलगावसह सावंतवाडी शहरालाही पाणीपुरवठा केला जाणार आहे. कोलगावमधून जाणाऱ्या पाइपलाइनद्वारे हे पाणी नरेंद्र डोंगरावरील साठवण टाकीत नेले जाईल, ज्यामुळे शहरवासीयांना २४ तास पाणी मिळणे शक्य होणार आहे.

ही योजना रखडल्याने मायकल डिसोझा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र आजच्या बैठकीत तांत्रिक अडचणी दूर करून कामाला गती देण्याचे ठरल्याने हा वाद निवळला आहे. बैठकीला पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, कोलगाव ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पडते, बाळू गवस यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

“कोलगावच्या हक्काच्या पाण्याबाबत आम्ही सकारात्मक असून, आवश्यक करार करून हे काम तातडीने पूर्ण केले जाईल,” अशी ग्वाही ॲड. अनिल निरवडेकर यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा