You are currently viewing मराठी भाषा दिनानिमित्त शाळेत पत्रलेखन कलेचा जागर

मराठी भाषा दिनानिमित्त शाळेत पत्रलेखन कलेचा जागर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी प्राथमिक शाळा, मुलुंड पूर्व येथे विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाची कला रुजवण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गावर्गात पत्रलेखन करून घेण्यात आले.

आजच्या डिजिटल युगात पत्रलेखन ही सुंदर कला हळूहळू लुप्त होत चालली आहे. व्हॉट्सॲप, ई-मेल आणि इतर डिजिटल माध्यमांमुळे हस्ताक्षरातील संवाद मागे पडत आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी आणि मुलांमध्ये तिचे महत्त्व रुजवण्यासाठी शाळेने हा उपक्रम हाती घेतला. शिक्षकांनी गोष्टीरूप पद्धतीने टपाल पेटी, पोस्ट खाते आणि पत्रव्यवहाराची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. पोस्ट खात्यात कार्यरत असलेल्या पालकांनीही या उपक्रमाला मोलाचे सहकार्य करत टपाल साहित्य उपलब्ध करून दिले तसेच विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे प्रत्यक्ष पोस्ट पेटीत टाकून घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली.

इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अक्षरात आणि भावपूर्ण शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांचे प्रेम, काळजी आणि त्याबद्दलची कृतज्ञता मुलांनी पत्रांतून मांडली. भविष्यात कोण बनायचे आहे, मोठे झाल्यावर काय करायचे आहे, तसेच कधी नकळत झालेल्या चुका मान्य करून माफी मागण्याची भावना देखील या पत्रांतून प्रकट झाली. काही विद्यार्थ्यांनी आई-वडिलांनी मोबाईलचा वापर कमी करून आपल्यासोबत अधिक वेळ घालवावा, अशी प्रेमळ तक्रारवजा सूचना सुद्धा केली.

या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पांडुरंग अनभुले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षक सतीश डोंगरे, मृणाली तावडे आणि सुरेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून पत्रलेखन करून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तीन दिवसांनंतर जेव्हा ही पत्रे अचूक पत्त्यावर आई-वडिलांच्या हातात पोहोचली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. मुलांच्या हस्ताक्षरातील भावना, अपेक्षा आणि प्रेम वाचून अनेक पालकांच्या डोळ्यांत पाणी तरळले आणि त्यांनी शाळेचे मनःपूर्वक आभार मानले. मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच मूल्यशिक्षण, संवेदनशीलता आणि संवादकौशल्य वाढवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा