कुडाळमध्ये ट्रक-स्कूटीची भीषण धडक;
महिलेचा जागीच मृत्यू
कुडाळ
कुडाळ शहरातील कुडाळ–मालवण नाबरवाडी मार्गावर आज सकाळी सुमारे ११.१५ वाजता ट्रक आणि स्कूटीमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने स्कूटीला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत स्कूटी चालवणारी महिला ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आज होळीचा सण असल्याने या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच या भागातील नगरसेविका सौ. श्रेया गवंडे तसेच भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू गवंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या चोरट्या वाळू वाहतुकीमुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर कुडाळ–नाबरवाडी रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा श्री. राजू गवंडे यांनी दिला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
