You are currently viewing कोकणच्या सागरीमार्गाला नवी दिशा
Oplus_16908288

कोकणच्या सागरीमार्गाला नवी दिशा

मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराला यश; मुंबई–विजयदुर्ग रो-पॅक्स सेवेतून विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांची संकल्पना साकार

मुंबई :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या मुंबई–विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा आज उत्साहात शुभारंभ झाला.

भाऊचा धक्का येथे देवपूजेनंतर मंत्री राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आली. पहिल्याच दिवशी मुंबईकर चाकरमानी व पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नव्या सेवेला प्रतिसाद दिला.

सागरी विकासाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा

ही रो-पॅक्स सेवा राज्याच्या सागरी पायाभूत सुविधांना बळकटी देणारी महत्त्वाकांक्षी योजना मानली जात आहे. कोकण आणि मुंबई यांच्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी जलमार्ग हा प्रभावी पर्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांचा वेळ, खर्च आणि प्रवासातील श्रम कमी होणार असून सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप अधोरेखित झाली आहे.

अर्थव्यवस्थेला चालना, प्रवासात वेळेची बचत

रो-पॅक्स सेवेमुळे कोकणातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय, स्थानिक व्यापार आणि उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यटनवाढीमुळे स्थानिक रोजगारनिर्मितीलाही हातभार लागणार आहे.

६२५ प्रवासी क्षमता असलेली ही बोट एकाच वेळी ४० चारचाकी व २५ दुचाकी वाहने वाहून नेऊ शकते. आरामदायी आसनव्यवस्था, आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि सुरक्षा सुविधा उपलब्ध असल्याने प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर ठरणार आहे.

मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण होणार असल्याने वेळेची मोठी बचत होणार असून वाहनांसह प्रवासाची सोय उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांसाठी हा पर्याय अधिक सोयीस्कर ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा