*काव्यप्रेमी महाराष्ट्र समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम कथा*
*शीर्षक:-मास्तर*
तोंडाच्या डाव्या बाजूचा व्हट आणि दात दोघांच्या मध्ये तंबाखूला दाबित व्हटाच्या उजव्या कोपऱ्यातून मास्तरनी पिचकारी मारली.डोळ्यावर लावलेल्या चाळीशीच्या मधोमध हाताच्या बोटाने वर सारत माझ्याकडं बघत मास्तर मला बोलला.काय बाई!.. या लेकराला घालायाचं का शाळेत? मी होय म्हटलं.आदरानं गुरुजींनी माझ्या लेकराच्या बोटाला धरून गोड बोलत शाळेत न्हेलं.मलाबी या मध्ये म्हणीत शाळेत बोलवलं.तेवढेच हलकसं मलाबी बर वाटलं.गुरुजी टेबलवरली वही हातात घेत खुर्चीवर बसलं.उजव्या हातात पेन घेतली.आन मला ईचारलं.काय नाव तुमचं?जना पारधीन.कुठं राहताव? पिढीवर.बरं ह्या पोराचं नाव काय?गण्या पारधी.पुन्हा गुरुजीनी इचारलं.अहोss.गण्या पारधी ठीक आहे.या पोराच्या वडिलांचे नाव काय.आणि तुमचं आडनाव काय? पवारीन. रामा. गुरुजींनी अंदाज करून समजून घेतलं.आणि पुन्हा गुरुजी म्हणाले.गणेश रामा पवार असच ना? व्हय…. लिव्हा काय बाय.ते बरूबर हाय.
गुरुजींनी दातात आणि व्हटात अडकवलेली तंबाखू डाव्या बोटाने काढली आणि खिडकीतून बाहेर टाकून दिली.पुन्हा गुरुजी खुर्चीवर बसले.समजून सांगण्याच्या स्वरात बोलले.बाई लेकराला रोज शाळेत पाठवा.त्याला खाऊ मिळतो.कपडे मिळतात.पाटी दप्तर मिळतय.सगळी सरकारनं सोय करून ठेवलीय.वाढलेल्या झिंज्या डोक्यावर फाटलेला लुगड्याचा तडप काळा कभिन्न पण तजेलदार चेहरा वर करत बाईंनं दबक्या आवाजात गुजींना इचारलं.गुरुजी ते इंग्रजी काय असतय वं? ते तुला कोणी सांगितलं? नाही!!!! ते चांगलं असतं मन. ते आपल्या शाळेत हाय न्हवं? होय होय.हाय सेमी म्हणत्यात त्याला.सिमी की बिमी हे आमाला काय समजायचय गुरुजी! लेकरू चांगलं शिकल असच बघा.आन आवर्जून ती मास्तरला बोलती झाली.गुरुजी!! माझं लिकरू दुसऱ्याच्या बिस्किटाची,गोळीची,पेनाची अन भाकरीची सुद्धा चुरी करल तेच्याकडं लक्ष ठेवा. त्याला भरपूर काय शिकवलं नाही तरी चालेल फक्त माणूसपण शिकवा आणि माणसं ओळखायला शिकवा.कारण आमच्या समाजाची लुबाडनुक लै व्हत्याय.चोरी कोण करून जाईल माहित नाही. पण आमच्यावर पोलीस खोट्या केस करतात मारतात सडवतात. गावातले पुढारी लोक दारू उदारीवर पेत्यात.पैसा मागायला गेलं की मारहाण करत्यात.तरण्या ताट्या पुरीच्या अंगाला हात लावत्यात.
सरकारच्या योजनेचं तर सांगायलाच नको कोण शेळी देतो म्हणतय.कोण मईस देतो म्हणतय.कोण घर बांधून देतो म्हणतय.आम्हालाबी रहावत नाही. सरकार काय तरी दिईल ह्या आसेवर आमीबी होय म्हणताव.जोबी किडूक मिडूक जमविलेला असतय त्यो त्यांच्या हावाली देऊनं टाकताव.सरकारची योजना काय पिढीपर्यंत येत नाही.
वादळ सुटावं आणि ते पिढीवर घोंगावत यावं.त्या वादळामध्ये पालापाचोळा भरा भरा करत वरती जावा तशा योजना आमच्या पिढीवरती सातत्याने फिरत असतात. खाली एक बी येत नाही. तशाच वाऱ्यावर ईरुन जातात… म्हणून ते जे इजणं हाय त्याला पेटवणारं मन माझ्या पोरात तयार करा.उजळणी बाराखडी शिकवत शिकवत जगण्याचं गणितबी शिकवायला ईसरू नका.त्याला चोरी करू नको म्हणावं.चूरी केल्यावर देव खोडी करत असतो तसबी सांगा.चांगल्यासाठी गुरुजी तुमी खोटं बोला.जमल्यास शाळेच्या पटांगणात एक झाड लावायलाबी शिकवा.तहानल्याची तहान आणि भूक लागलेल्या माणसाचं मनं वंळकायला शिकवा.तेवढं जरी माझं पोरगं शिकलं तरी आम्ही पावलो असच आम्ही समजू.लुटा-लूट, खून मारामाऱ्या हें पाप असतय म्हणावं ते देवाला पावत नाही म्हणा.आन गुरुजी त्याला कोणचाच रंग शिकऊ नका.आता सगळेचं रंग भ्रष्ट झालेत.जेवढे रंग पवित्र होते ते रंग त्याचे रूप सगळेच मलिन झालेत. कारण शिकवणारेच आता भ्रष्ट झालेत.त्याबद्दल माझ्या लेकराला कधीच शिकवू नका. त्याला धर्म शिकऊ नका. त्याला त्याग शिकवू नका.त्याला देश प्रेम सुद्धा शकऊ नका. फक्त भाकरीसाठी इमान राकून राबायचं कसं असतं एवढेच शिकवा. त्याला आईपण बाईपण बहीणपण भावंडं आणि समाजातली नातीगोती शिकवायला मातर कधीच ईसरू नका.
बाई बोलत होती. गुरुजी निस्त त्या बाईकडे टक लावून बघत व्हतं.
मास्तर विचार करीत राहिलं. हातातली पेन थरथरत खाली पडली या बाईत एवढी समज आली कुठून?समज येण्यासाठी त्या बाईनं कोणते अनुभव घेतले असतील?ती आपल्या लेकरात काय पाहत असेल? काय अनुभवत असेल? अनेक प्रश्नांनी मास्तरला घेराव घातला.बाई मात्र मास्तरला नमस्कार करून झपाझपा पावलं टाकत पिढीच्या दिसेनं निघून गेली…..
✒️भूमिपुत्र वाघ, धाराशिव
