You are currently viewing जॅक्स–रेहानच्या भागीदारीच्या जीवावर इंग्लंड उपांत्य फेरीत; न्यूझीलंडचा थरारक पराभव

जॅक्स–रेहानच्या भागीदारीच्या जीवावर इंग्लंड उपांत्य फेरीत; न्यूझीलंडचा थरारक पराभव

*जॅक्स–रेहानच्या भागीदारीच्या जीवावर इंग्लंड उपांत्य फेरीत; न्यूझीलंडचा थरारक पराभव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८ फेरीतील अत्यंत रंगतदार आणि उत्कंठावर्धक लढतीत इंग्लंडने न्यूझीलंडवर ४ गडी राखून थरारक विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अखेरच्या तीन षटकांत रंगलेला संघर्ष, विल जॅक्स आणि रेहान अहमद यांच्या धडाकेबाज भागीदारीमुळे इंग्लंडच्या बाजूने झुकला आणि सामना अविस्मरणीय ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या. टिम सायफर्टने २५ चेंडूंमध्ये ३५, तर ग्लेन फिलिप्सने २८ चेंडूंमध्ये ३९ धावांची जबाबदार खेळी केली. फिन अ‍ॅलन, रचिन रवींद्र आणि मार्क चॅपमन यांनी उपयुक्त योगदान दिले. मात्र इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. आदिल राशीद आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी २ बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली.
१६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात फिल सॉल्ट बाद झाला. पुढच्याच षटकात जोस बटलर शून्यावर तंबूत परतला. अवघ्या २ धावांत २ गडी बाद झाल्याने इंग्लंडवर प्रचंड दबाव निर्माण झाला. कर्णधार हॅरी ब्रूकने २४ चेंडूंमध्ये २६ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाद झाल्यावर इंग्लंड संघावर पुन्हा संकट आलं.
जेकब बेथेल, सॅम करन आणि टॉम बॅन्टन यांनी झुंजार खेळी करत डाव पुढे नेला. मात्र रचिन रवींद्रच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडची अवस्था १६.५ षटकांत ६ बाद ११७ अशी झाली. अखेरच्या ३ षटकांत ४३ धावांची गरज असताना सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकलेला वाटत होता.
याच क्षणी मैदानात उतरलेले विल जॅक्स आणि रेहान अहमद यांनी सामन्याचे संपूर्ण चित्र पालटले. विल जॅक्सने १८ चेंडूंमध्ये नाबाद ३२ धावांची झंझावाती खेळी साकारली, तर रेहान अहमदने अवघ्या ७ चेंडूंमध्ये १९ धावा ठोकत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. या दोघांनी अवघ्या १६ चेंडूंमध्ये ४४ धावांची अभेद्य भागीदारी करत इंग्लंडला १९.३ षटकांत १६१ धावांपर्यंत मजल मारून दिली आणि संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. आयसीसी टी-२० विश्वचषक सुपर–८ टप्प्यात इंग्लंडचा हा सलग तिसरा विजय ठरला. विल जॅक्सने या स्पर्धेत चौथ्यांदा ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावत एका विश्वचषक हंगामातील इंग्लंडकडून सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारांचा विक्रम आपल्या नावावर केला. तसेच, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत निर्णायक विजय मिळवून देणारी जॅक्स–रेहान जोडी ही सर्वात जलद धावगतीने सामना संपवणारी भागीदारी ठरली.
न्यूझीलंडविरुद्धच्या या विजयामुळे इंग्लंडने सलग पाचव्यांदा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम साधला. दबावाखाली शांत राहून सामना खेचून नेण्याची इंग्लंडची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून संघाची विजेतेपदाची दावेदारी अधिक बळकट झाली आहे.
या निकालामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा अद्याप जिवंत राहिल्या असून आता श्रीलंकेविरुद्धचा सामना त्यांच्या दृष्टीने ‘करो या मरो’ ठरणार आहे.
एकूणच, विल जॅक्स आणि रेहान अहमद यांच्या धडाकेबाज खेळीमुळे रंगलेला हा सामना टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात थरारक लढतींपैकी एक ठरला असून क्रिकेटरसिकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा ठरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा