*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*मराठीच बोलू कौतुके*
!! माझा मराठाची बोलू कौतुके |
परि अमृतातेही पैजा जिंके !!
–संत ज्ञानेश्वर
भाषा ही कोणत्याही मानवी सामाजिक जीवनाचा आधार आहे. ते परस्पर संवादाचे जसे प्रभावी माध्यम आहे तसेच ते ज्ञानसंचय, ज्ञानप्रदानाचे ही महत्त्वाचे माध्यम आहे. संस्कृती, इतिहास, आचार-विचाराचे महत्त्वाचे साधन म्हणून भाषेकडे पाहिले जाते. मराठी हि महाराष्ट्राची राजभाषा आहे. महाराष्ट्राची ती मातृभाषा आहे..
मराठी भाषेला साधारणतः लिखित साहित्याचा बाराशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. महाराष्ट्रात आणि जगात पंधरा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. प्राचीन कालखंडापासून अतिशय दर्जेदार साहित्याची निर्मिती मराठी भाषेतून झालेली आहे. ज्ञानेश्वर-लीळाचरित्र, तुकारामांची गाथा, नामदेवांची-अभंगवाणी, बखर, पोवाडे ही प्राचीन मराठी भाषेची खरी ओळख असून त्यांची ख्याती सातासामुद्रांपलीकडे पोहोचली असून यांचा अनेक भाषांत अनुवादही झाला आहे. आधुनिक युगात निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक व ललित गद्य तसेच दलित, ग्रामीण, स्त्रीवादी आणि आदिवासी साहित्यातून देशभर आणि जगभर मराठीची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली आहे.
समाजातील दिन-दलित, वंचित, उपेक्षित घटकांच्या मनोव्यथेचा पहिला हुंकार मराठी साहित्यातूनच उमटला. अभिजनांच्या साहित्य जाणिवांपेक्षा बहुजनांच्या जीवन वेदनेला स्थान देणारे मराठी साहित्यच आहे.
शिक्षणाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे साधन असूच शकत नाही म्हणूनच महाराष्ट्रात उच्चशिक्षण मराठी भाषेतून
दिले जावे…. मराठी भाषेत अकराव्या शतकापासून संतानी सातत्याने ज्ञानाची क्रांती केली आहे. मराठीतील लोकवाङ्मय व लोकसंस्कृतीच्या खुणा मराठीतून विविधतेने नटलेल्या दिसतात… अनेक श्रेष्ठ संत मंडळींनी आपल्या बोलीतून मराठी भाषेला सजविले, फुलविले व मोठे केले.. विसाव्या एकविसाव्या शतकातील अनेक थोर लेखक,कवींनी आपल्या
शब्दसामर्थ्यामधून मराठी भाषा समृध्द केली पण हीच आपली मातृभाषा कुठेतरी मागे पडते आहे हे विधान सर्वत्र ऐकायला मिळते आणि ह्या मागे एक आर्त कळकळ असते ती आपल्या मातृभाषेवरील प्रेमाची, आस्थेची… मुळात भाषा कशासाठी तर संवाद साधण्यासाठी, भावना, विचार मांडण्यासाठी, ते जतन करून ठेवण्यासाठी, विकासासाठी… आणि मग जेव्हा हीच भाषा मागे पडते तेव्हा फक्त भाषा नाही तर एक संपूर्ण मानव समुह , एक संस्कृती मागे पडते.
जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषा नवनव्या आव्हानांना सामोरी जाऊन, कधी त्यात सामावून तर कधी सामर्थ्याने अनेक क्षेत्रात प्रभावीपणे पदार्पण करताना दिसते आहे. या भाषिक संक्रमणाच्या युगातही मराठीने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे. कला, संस्कृती, क्रीडा, न्यायालयीन व वैधक कामकाज, गणित, विज्ञान, उपयोजीत मराठी, संगणक, वृतपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, मोबाईल इत्यादी अनेक क्षेत्रांत मराठी भाषा आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. नव्या क्षेत्राची परिभाषा मराठीने आत्मसात केली आहे. या पुढेही मराठी भाषेला नव्या नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सजग रहावे लागणार आहे हे नक्की..
!!लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !!
खरंच हे दिवस महाराष्ट्रात आहेत का? मातृभाषा आहे म्हणून मराठीचं कौतुक आहेच. पण बऱ्याचदा असं होतं की मुलं मराठी कुटुंबातून आलेली असली तरी त्यांच्यावर इंग्रजीचा प्रभाव जास्त असतो. अगदी उलट परिस्थिती जेव्हा इतर भाषिक लोक एकत्र येतात तेव्हा असते. तेव्हा खंत वाटते की आपलं आपल्या मातीशी असलेलं नातं तुटतंय का? महाराष्ट्राच्या मातीशी असलेले घट्ट ऋणानुबंध टिकवून ठेवणारी आपली मातृभाषा आहे. जिचा गोडवा अवीट आहे जिने राष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कारविजेते लेखक-कवी घडवले जिने बॉलीवूडकरांनाही भुरळ घातली ती भाषा बोलण्यात कमीपणा वाटण्याचं काही कारणच नाही. दुसऱ्याची वाट न पाहता स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे असे मनापासून नमूद करीन.. तसंच कॉलेजच्या मराठी वाङ्मयमंडळांची ही व्याप्ती वाढली पाहिजे तरच जास्तीत जास्त मराठी साहित्य जनमानसांत पोहोचेल व मराठी केवळ कागदापूर्तीच मर्यादित न राहता सगळ्यांच्या मनामनात राहील. मातृभाषेमधून जे संस्कार मनावर, बुद्धीवर होतात ते कुठेतरी आत्म्यात रुजत असावेत.. मातृभाषेत विचारांची जडणघडण झाली तर माणूस प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागतो आणि हळूहळू सगळ्या समाजाचीच
विचारसरणी बदलते. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगणे हा संकुचितपणा असा विचार करणारे आम्ही भाषेच्या डबक्यातच अस्तित्व असणारे बेडूक नसून एका विचारी आणि सर्वसमावेशक राज्याचे नागरीक आहोत हे सांगायला नकोच.
आमच्या मराठीची पीछेहाट होण्यामागे दुसरं तिसरं कोणी जबाबदार नसून आम्हीच आहोत. आम्हीच मराठी बोलायला टाळायला लागलो. अश्याने बाकीच्या भाषा बोकाळल्या आणि आम्ही त्यांचा उदो उदो करत रहिलो.
अहो या मराठीने तिचं गाऱ्हाणं सांगावं तरी कोणाला ? झोपेचं सोंग घेतलेल्यांना की खरंच या विषयाचं गांभीर्यच न उमगणा-यांना ? मराठीचं बोलण कळेल तरी का या इंग्रजाळलेल्या मराठी फकिरांना ?
मराठीच मराठी राहिली नहिये. तिची कक्षा रुंदावी, तिची प्रगती व्हावी असं तिलाही वाटत असणारचं ना ? पण मग काय कुठलीही भेसळ सहन करावी का तिने ? मराठीचं शुद्धीकरण करायला प्रत्येक पिढीत सावरकर जन्माला येतीलच असं नाही ना..! सावरकरांनी मराठीला इंग्रजी राजवटीत वाचवलं, सावरलं आणि पुन्हा उभं केलं. मराठीत कित्येक शब्द सावरकरांनी रुजू केले. पण ते इंग्रजीतून अथवा इतर प्रांतीय भाषांमधून नाही तर तिचं मूळ जिच्यात होतं अशा संस्कृतमधून..
किती श्रीमंत ही मराठी.. ज्ञानदेव तुकोबारायांसारखे संत मराठीच्या छायेत वाढले. तर या मराठीच्या अंगाखांद्यावर माडगुळकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुरेश भट, भा.रा तांबे, आरती प्रभू अश्या अनेक महान कवींची कविता खेळली, बागडली. व. श्री. ना. पेंडसे, पु. काळे, जी. ए. कुलकर्णी, शं. ना. नवरे, अशा कित्येक कथाकारांच्या गोष्टीचं कथेत रुपांतर झालं. भारुड, जात्यावरच्या ओव्या, गोंधळ असे गेय साहित्य प्रकार, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा असे ग्रंथ या मराठीने प्रत्येक मराठी
मनापर्यंत पोहोचवले. हे साहित्य पुढल्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कुठपर्यंत झेपेल हे कोणास ठाऊक?.. . कारण हे समजायला मराठी गाभा लागतो. आणि हे साहित्य श्रुती, स्मृती या माध्यमांमधून जर पुढे गेलं नाही तर हे सगळं कुठेतरी लुप्त होण्याची फार दाट शक्यता आहे .. मनाला लागलेली एक रूखरूख..
कुठलीही भाषा शिकायला फारसा काळ लागत नाही. त्या भाषेत प्रभुत्व मिळविण्याची इच्छा असेल तरीही नाही… त्यासाठी मुलांना इंग्रजी शाळांमध्येच शिकविण्याचा आग्रह का ? या सगळ्या अट्टाहासात मुलांचा आत्मविश्वास तर बळी पडत नाहीये ना? न्यूनगंड तर निर्माण होत नाहीये ना ? असा विचार या पालकांनी वेळीच केलेला बरा.
मराठीच्या उत्कर्षासाठी झगडणं हा आमचा मराठी धर्म. महाराष्ट्रात मराठी बोलून जर समोरच्याला कळत नसेल तर आम्ही मराठी सोडण्याची नाही तर समोरच्याने मराठी शिकण्याची गरज आहे असं माझ्यासारख्या मराठी माणसाचं ठाम मत आहे. यातून मराठीचं अस्तित्व टिकून राहील आणि त्या निमित्ताने एक नवीन भाषा शिकण्याचं भाग्यही शिकविणा-याला लाभेल असे मला वाटते..सध्या इंग्रजी आणि हिंदी ची लाट आहे. पण जेंव्हा प्रयत्नांती मराठीच पारडं जड होईल ना तेव्हा हेच इंग्रजाळलेले मराठी पुन्हा मराठीच्या लाटेत निर्विकारपणे का होईना सामील होतील अशी आशा मनी आहे.
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे @
9870451020
