कणकवलीतील इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धेचा निकाल जाहीर
कणकवली
गणेश मूर्ती प्रदर्शनाचा हा उपक्रम खूप स्तुत्य आहे.या मूर्ती इको फ्रेंडली कागदाच्या लगदयापासून पासून बनवल्या असल्याने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आकर्षक असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही गरज बनली आहे. गणेश उत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणणारा असून मूर्तिकारांच्या उन्नतीसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत कोणत्या उपाययोजना करता येतील काय? त्यासंदर्भात विचार केला जाईल .त्याचप्रमाणे मूर्तिकारांच्या विकासासाठी मूर्तिकार संघ आणि प्रशासन यांची एकत्रित बैठक घेऊन मूर्तिकारांना कोणत्या गोष्टीची प्रामुख्याने आवश्यकता आहे हे पाहून यातून पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी लागेल ते सहकार्य प्रशासनाच्या माध्यमातून मिळेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले. श्री गणेशमूर्ती संघ सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा बँक व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भगवती मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धा व प्रदर्शन पार पडले. यात फोंडाघाट येथील अलोक गोसावी यांना प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. प्रदर्शन समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचा निकाल : 1. अलोक गोसावी (फोंडाघाट), 2. आनंद मेस्त्री (माणगांव – कुडाळ), 3. अमीत मेस्त्री (पडवे). पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे 11 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये तसेच प्रत्येकी सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देण्यात आले. उत्तेजनार्थ – शशिकांत सातोसे (नागवे – कणकवली), उदय राऊत (माडखोल – सावंतवाडी) त्यांना प्रत्येकी 2100 रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष कौशल्य विजेते : रंगसंगतीसाठी – अतुल सावंत (कुणकेरी- सावंतवाडी), मूर्ती सुबकतेसाठी केदार टेमकर (कुडाळ), लिखाईसाठी -धाकू वर्देकर (कलमठ) व कौशल्यसाठी – शरद भोगले (हिवाळे) यांना प्रत्येकी 1100 रुपये तसेच सन्मामानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, स्पर्धेचे परीक्षक व देवरूख कॉलेजचे प्राचार्य रणजीत मराठे, प्रा. जनार्दन खोत, श्रीगणेश मूर्तीकार संघाचे जिल्हाध्यक्ष बापू सावंत, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशमूर्तीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल यानिमित्ताने होत असते. जिल्हा बँकेच्यावतीने गणेशमूर्ती करण्यासाठी विशेष बाब म्हणून दोन लाखाचे कर्ज गणेश मुर्तीकार यांनी दिले जात आहे .जवळपास साडेतीन कोटीची उलाढाल या निमित्ताने जिल्हा बँकेने केली आहे. भविष्यात सिंधुदुर्गातील मूर्तिकारांच्या मुर्त्या केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून इको फ्रेंडली गणेशमूर्ती हा त्यासाठी एकमेव पर्याय आहे. प्रशासनाने मूर्तिकारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करावे अशी अपेक्षा सतीश सावंत यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी परीक्षक रणजीत मराठे व भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी मार्गदर्शन केले. मूर्तीकार संघाचे जिल्हाध्यक्ष बापू सावंत यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे मूर्तिकार यांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले व आभार अनिरुद्ध देसाई यांनी मानले.