पटसंख्या व अतिरिक्त शिक्षक धोरणातील बदलासाठी मंत्री नितेश राणे यांची भक्कम भूमिका
मंत्रालयात भेट घेऊन शिक्षण संस्था व शिक्षकांनी व्यक्त केली कृतज्ञता
मुंबई :
कोकणातील मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होण्याच्या भीतीत असताना शिक्षण विभागाच्या बैठकीत ठाम भूमिका मांडत पटसंख्या आणि अतिरिक्त शिक्षक धोरणात बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच’ सिंधुदुर्गने आभार मानले.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्री राणे यांनी कोकणातील भौगोलिक परिस्थिती, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची संख्या आणि शाळांची वास्तव स्थिती याबाबत सविस्तर मांडणी केली. या हस्तक्षेपामुळे सिंधुदुर्गसह कोकणातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांचे वर्ग बंद होण्यापासून वाचल्याचे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर मंचाच्या शिष्टमंडळाने मुंबईतील मंत्रालयात मंत्री राणे यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. मंचाचे अध्यक्ष संजय वेतुरेकर, सदस्य अजित कांबळे, कमलाकांत उर्फ बाळू कुबल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व माजी अध्यक्ष सतीश सावंतही यावेळी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने मंत्री राणे यांना आभारपत्र देत, “कोकणातील शाळा वाचल्या म्हणजे भावी पिढी साक्षर, सुशिक्षित आणि स्वावलंबी होईल; त्यासाठी आपले योगदान अनमोल आहे,” असे पत्रात नमूद केले.
ओरोस येथे झालेल्या मोर्चावेळी “शाळांचे वर्ग बंद होऊ देणार नाही,” अशी दिलेली ग्वाही मंत्री राणे यांनी प्रत्यक्षात उतरवली असल्याचे सांगत, त्यांच्या भूमिकेचा अभिमान वाटत असल्याचे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी यावेळी सांगितले.
