*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बघू नको मागे कधी..!*
बघू नको मागे कधी टाक पुढेच पाऊल,
कच खाण्याची ही वृत्ती व्याधी नवीन लावेल..
चाल ठाम पावलांनी मनी विश्वास ठेवूनी,
बघू नको मागे कधी श्वास भरावा स्वप्नांनी..
येता संकटे वाटेत मार्ग नवे मिळतील,
पुढे धैर्याने तू जाता दिशा ध्यासांनी खुलेल..
चुका मनात ठेवून ओझे वाढवू नकोस,
अपयश आयुष्याची सीमा मानू तू नकोस..
प्रयत्नांच्या आकाशात अंधार विरघळतो,
स्वत:ला थांबवणारा जिंकण्याआधी हरतो..
तुला तोडणारे शब्द अनेकदा भिडतील,
संशयाचे काटे मनी खोलवर रुततील..
शांतपणे चालताना सत्य तुलाच भेटेल,
वेळ नाही,कृतीतून त्यांना उत्तर देशील..
मागे पाहिलेस तर भीती वाढत जाईल,
पुढे पाहिलेस तर आशा भरारी घेईल..
सवयींना सोडून तू चालायला शिकशील,
तेव्हा स्वत:ची ओळख खर्या अर्थाने घडेल..
वाटचाल वेगळीशी नको कुणाची नक्कल,
मनातला आवाज तू ऐकायला शिकशील..
तेव्हा सही आयुष्याची वेगळीच उमटेल,
बघू नको मागे कधी मनाशी ठसवशील..
अडखळलीस तरी स्वप्न दीप ना विझावे,
पुढे जातानाच हात भविष्याने तुला द्यावे..
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
