साटेली तर्फ सातार्डा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी, डंपर चालक फरार
दोडामार्ग :
तालुक्यातील साटेली तर्फ सातार्डा येथे आज दुपारी भीषण अपघात घडून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमीस स्थानिकांच्या मदतीने तात्काळ मळेवाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, अज्ञात डंपर चालकाने दुचाकी (MH 07 AW 0448) ला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत साटेली समोर घडला. धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर स्थानिक उमेश कांबळी, संभाजी नाईक, बाबा कोरगावकर, विष्णू मांजरेकर व बाळा साटेलकर यांनी तत्परता दाखवत जखमीस मळेवाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रस्ता रोखून धरत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून अज्ञात डंपर चालकाचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.
