You are currently viewing स्त्री जाणीव कोषातून बाहेर पडून समाज मनावर परखड भाष्य करा.. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांचे प्रतिपादन 

स्त्री जाणीव कोषातून बाहेर पडून समाज मनावर परखड भाष्य करा.. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांचे प्रतिपादन 

पुणे, (प्रतिनिधी) :

स्त्री गझलकारांनी स्त्री जीवनाचा संघर्ष, व्यथा, वेदना दुःख, शृंगार, प्रणय अशा स्त्री जाणीव कोषातून बाहेर पडून समाज मनावर, समाज जीवनावर परखड भाष्य करणे अपेक्षित आहे. यासाठी स्त्री जीवनाची तटबंदी उद्धवस्त करून दृष्टी अधिक व्यापक करायला हवी. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी पुणे येथे केले.

 

गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकारा ज्योत्स्ना राजपूत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गझलकारा श्रद्धा खानविलकर, गझलकारा निर्मिती कोलते उपस्थित होत्या. नामांकित गझलकारा वैशाली माळी या स्वागताध्यक्षा होत्या. डॉ. स्नेहल कुलकर्णी आपल्या अध्यक्षीय मनोगतात स्त्री गझलकारांच्या आजवरच्या गझलप्रवासाचा अत्यंत ओघवत्या शैलीत उहापोह करताना पुढे म्हणाल्या की, गझलेशी नाते जोडून तिने स्वतःला खणून काढायचे ठरवलेच आहे तर स्वतःला तळापर्यंत खोदावं आणि जे खणून काढलंय ते अलिप्त नजरेने अभ्यासावं. त्यात नक्कीच जीवनमूल्ये मिळतील, जीवनाचे विविध रंग मिळतील… ते लेखणीतून झिरपू द्यावेत. आपणच खणून काढलेल्या पोकळीत उभे राहून मी एकाकी असल्याची व्यथा मांडणे आणि त्याचे भांडवल करणे पूर्णपणे टाळावे. स्त्री गझलकारांचा शेर म्हणजे व्यथा वेदना किंवा प्रणय शृंगार यांचे समीकरण.. याच दृष्टीकोनातून बरेचदा पाहिलं जातं. हे पूर्णपणे खोटे नसले तरी ते पूर्णपणे खरंही नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी महिला गझलकारांवर आहे. त्यादृष्टीने तिने लेखणी उचलणे गरजेचे आहे. यासाठी शेरात सहजता, आशयघनता, संप्रेषणीयता, उत्स्फूर्तता हवी. त्यात वैश्विकता यायला हवी असं त्या म्हणाल्या. स्त्री गझलकारांची लेखणी अधिक सजग, सतर्क होण्यासाठी मार्मिक व मौलिक असे मार्गदर्शन डॉ. कुलकर्णी यांनी केले केले.

 

या संमेलनात ज्येष्ठ गझलकारा ममता सिंधुताई यांना गझलक्रांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गझलकारा दिपाली कुलकर्णी व मानसी जोशी यांना गझलयात्री पुरस्कार देण्यात येणार आला. तसेच कै.जबनाबेन सोमजी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहादा (जि. नंदुरबार) येथील सोहंम कोलाईड्स तसेच श्री शरद सोमजी पाटील व सौ. हेमलता शरद पाटील यांच्यातर्फे दिला जाणारा यंदाचा गझलध्यास पुरस्कार धाराशिव येथील गझलकारा स्नेहलता झरकर-अंदूरे यांना प्रदान करण्यात आला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन दिपाली सुशांत यांनी केले. परिचय व सन्मानपत्राचे वाचन डॉ. विजया नवले व नंदिनी काळे केले.

 

संमेलनात ‘समकालीन गझलेत महिला गझलकारांचे मूल्यवर्धक योगदान’ या विषयावर चर्चासत्र झाले. स्त्री गझलेवर विविध अंगांनी भाष्य करणारे, तिचा परामर्श घेणारे हे चर्चासत्र संमेलनाचा मानबिंदू ठरले. समस्त मराठी महिला गझलकारांची लेखणी अधिक सजग, समृद्ध होण्याच्या दृष्टीने हे चर्चासत्र खूपच उद्बोधक व सकारात्मक होते. स्त्री गझलकारांना सन्मानित करणारे होते. चर्चासत्रात ज्येष्ठ गझलकार भूषण कटककर, प्रमोद खराडे व डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

त्यानंतर दिवसभर विविध गझल मुशायरे झाले. त्यात महाराष्ट्रसह भारतातील विविध भागातून आलेल्या महिला गझलकारांनी रंग भरले. या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद ममता सिंधुताई, देवका देशमुख, निशा चौसाळकर, मानसी चिटणीस, स्नेहलता झरकर अंदुरे यांनी भूषविले. तर सूत्रसंचालन जयश्री कुलकर्णी, स्वाती यादव, सारिका पाटील, दिपाली कुलकर्णी, प्रज्ञा कुलकर्णी यांनी केले. तरुजा भोसले यांनी आभार मानले.

 

या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शिवाजी काळे, प्रदीप तळेकर, डॉ. मंदार खरे, वैशाली माळी, बा. ह. मगदूम, डॉ. रेखा देशमुख, ॲड. मुकुंदराव जाधव, गझल मंथन साहित्य संस्थेच्या विविध समित्या, पुणे विभागीय व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

————————————————–

सही

भरत माळी

प्रसिद्धी प्रमुख, गझल मंथन साहित्य संस्था

मो. 9420168806

प्रतिक्रिया व्यक्त करा