व्यावसायिक मित्र राजू आजगावकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन
कणकवली :
येथील व्यावसायिक क्षेत्रातील परिचित नाव असलेले राजू आजगावकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कणकवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजू आजगावकर यांचे एस.टी. स्टँड कणकवली नजीक इलेक्ट्रिकचे दुकान होते. आपल्या मनमिळावू आणि हसतमुख स्वभावामुळे ते ग्राहक आणि मित्रपरिवारात विशेष लोकप्रिय होते. “केव्हाही भेट झाली की राजू हसतमुखाने हाक मारायचा. चहा घेतल्याशिवाय त्याने मला कधी जाऊ दिले नाही. एक जिवाभावाचा व्यावसायिक मित्र गमावला,” अशा शब्दांत अजित नाडकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांचे निवासस्थान आशिये मठ येथे असून त्यांचे मूळ गाव हरकुल आहे. हरकुल येथील बागेत गेले असता त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून अनेकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
“जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला,” असे सांगत अजित नाडकर्णी यांनी आपल्या जिवलग मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
