नागपूर येथे रेशीम बाग येथील मैदानात रविवार दि.22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनानिमित्त
संत नामदेव व त्यांची कविता
कित्येक विचारवंतांच्या मते महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तसेच ज्ञान आणि पुरूषार्थ यांचा येथे वावर आहे. ‘विद्य आणि पुरुखु महाराष्ट्री नांदती’ असे श्री चक्रधर स्वामींनी म्हटले आहे. याही दृष्टीने ज्ञानी असलेल्या संतांचे विशेष महत्त्व आहे. संतांनी समाजाला सत्याची नि संपन्नतेची दिशा दिली. एका अर्थाने संत साहित्य लोकसाहित्य आहे. संत लोकशिक्षक आहेत. मानवी जीवनाच्या कल्याणार्थ संतांचे कार्य अनन्यसाधारण आहे. महाभारतात यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला होता, ‘को दिक्’ (दिशा कोणती?) क्षणाचाही विलंब न लावता युधिष्ठिराने उत्तर दिले ‘संतोदिक’ (संत हीच दिशा) अशी ही शब्दातीत संतांची महती अहे.
आदर्शांचा मानदंड असलेले संत उत्तम कवी आहेत. ज्ञानेश्वरांपासून तर राष्ट्रसंत तुकडोजींपर्यंत संताच्या कवितेचा विचार केला तर त्यात जीवनमूल्यांची संपन्नता दिसून येते. यात संत कवयित्रींचाही समावेश होतो. संत काव्यात बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठाही प्रतीत होते.
अशा लोकोत्तर, निरलसपणे सकारात्मक व रचनात्मक कार्य करणार्या, समाजोत्थानार्थ झटणार्या संतात नामदेवांचा समावेश होतो. २६ ऑक्टोबर १२७० ते ३ जुलै १३५० हा त्यांचा कालखंड आहे. त्यांचा जन्म नरसी-बामणी की पंढरपूरला झाला? या विषयी विचारवंतांत मतभेद आहेत. त्यांचे कार्य मात्र देशव्यापी आहे. उक्ती आणि कृतीमध्ये ऐक्य असलेल्या नामदेवांनी दळणवळणांची साधने नसल्याने भारताच्या विविध भागात पायी प्रवास केला. त्यांच्या मानवहितैषी दृष्टीने केलेल्या कार्याचा सर्वत्र ठसा उमटला आहे. गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश इत्यादी सर्वदूरवर त्यांच्या समाजप्रवर्तक कार्याची पताका फडकली आहे. प्रदेशनिहाय त्यांनी विविध भाषा आत्मसात केल्या. कित्येकदा या प्रवासात त्यांच्यासोबत विविध संत असल्याचे पुरावे सापडतात.
विविध राज्ये, तेथील मौलिक स्थळे यांना भेटी दिल्यानंतर ज्ञानेश्वरांनी आळंदीला समाधी घेतली. त्यावेळी नामदेवांचे वय केवळ सव्वीस वर्षांचे होते. हा करूण प्रसंग त्यांनी आपल्या कवितेत हृद्य शब्दांत व्यक्त केला. आजही त्यातून त्यांचे भावुक मन वाचकाला अंतर्मुख करते. ज्ञानदेवांच्या समाधीने शोकाकुल निवृत्तीनाथांना धीर देण्याचे कार्य नामदेवांनी केले. हा गंभीर प्रसंग कारूण्यपूर्ण शब्दांत नामदेवांनी साक्षात केला. त्यावेळी त्यांचे भक्तिप्रवण व्याकूळ मन भरून आले होते. “नामा म्हणे आता लोपला दिनकर| बाप ज्ञानेश्वर समाधिस्त॥” (स.सं.गाभा ११००) ही काव्यपंक्ती खूप बोलकी आहे.
नामदेवांची कविता विविधतासंपन्न आहे. तेथे विविध रसांची पखरण आहे. तिला लोकजागृतीचा लळा आहे.
ज्ञानेश्वरीविषयीचे त्यांचे मत आजही कित्येकांना मुखोद्गत आहे. ‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी| एक तरी ओवी अनुभवावी॥’ हे त्यांचे उद्गार आद्य संत समीक्षक म्हणून आजही गौरवाने उल्लेखिले जातात. धीर गंभीर रचना करणारे नामदेव अल्लड वृत्तीनेही तेवढीच खेळकर रचना करताना दिसतात.
“पतितपावन नाम ऐकुनी आलो मी दारा|
पतितपावन न होशी म्हणुनि जातो माघारा॥
घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार|
केवी रोधू देवा तुझे मी कृपणाचे दार॥”
नामदेव देवावर रागावतात. जो प्रेम करतो त्यालाच रागावण्याचा अधिकार असतो. प्रेम आणि राग ह्या ऊनपावसाप्रमाणे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रसंगोपात राग व्यक्त करणारे नामदेव दुसर्याच क्षणी लिहून जातात,
“देह जावो अथवा राहो| पांडुरंगी दृढ भावो|
चरण न सोडी सर्वथा| तुझी आण पंढरीनाथ॥”
असा हा आर्त भक्ताचा लडिवाळपणा आहे. संत नामदेव विठ्ठलचरणी अनन्यभावे लीन होतात. ते निष्ठावंत भक्त आहेत. त्याचे अनेक पुरावे त्यांच्या कवितेत आढळतात.
प्रपंच व परमार्थ हे दोन अभिन्न नाहीत, हे खरे असले तरी प्रपंच सोडा असे नामदेवांनी म्हटलेले नाही. त्यांनी अधूनमधून प्रपंचाविषयी दु:ख, वैताग व्यक्त केलेला असला तरी प्रपंचविन्मुख व्हा असा त्याचा अर्थ नाही.
स्वातंत्र्य, समता, बंधुता ही प्रसिद्ध त्रिसूत्री फ्रेच राज्यक्रांतीनंतर प्रकर्षाने पुढे आली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात या त्रिसूत्राने आपल्या देशात सर्वत्र परिवर्तनाची लाट उसळली. इंग्रजी सत्ता हादरली. मात्र ज्या कालखंडात नामदेवादि संतांनी जी भक्तिपताका खांद्यावर घेऊन मानवतावादी दृष्टीने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात कवितेच्या माध्यमातून जीवनमूल्यांची रूजवण केली, तिला जगाच्या इतिहासात तोड नाही. म्हणूनच ‘है संत दुनियामें जगे तबही रही दुनिया खडी’ हे संत तुकडोजी महाराजांचे उद्गार स्पृहणीय नि चिंतनीय वाटतात. कसल्याही लिप्ताळ्यात गुंतून न पडता मानुषमूल्यांची रूजवण करणारे संत एक दृष्टीने क्रुसेडर ठरतात.
आज आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला याचे फार मोठे श्रेय संत साहित्याला आहे. कसलीही प्रसारमाध्यमे आणि दळणवळणाची साधने नसताना संतांचे समाजप्रवर्तन, जीवनोत्थानाचे, समुपदेशात्मक साक्षेपी कार्य सर्वदूर पोचले. निश्चेष्ट मनाला जागविण्याचे व त्याला कार्यप्रवण करण्याचे सामर्थ्य संतांच्या विचारात आहे. येथे साहित्यमूल्यांवर जीवनमूल्ये मात करताना दिसतात. संत निरपेक्ष, निर्व्याज, निर्वेध मनाने काव्यनिर्मिती करतात. तत्कालीन स्थळ, काळ, परिस्थिती यांच्या पार्श्वभूमीवर हे कार्य आभाळाएवढे विशाल ठरावे.
मराठी संतांची काव्य निर्मिती मराठी भाषेत आहे. नामदेव याला अपवाद आहेत. मराठीबरोबर त्यांनी हिंदी भाषेतही काव्यनिर्मिती केली. त्यांचा वावर महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातही दिसून येतो. पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेशातही नामदेवांची मंदिरे आहेत. उत्तर भारतातील रोहिदास, रज्जब, धना, तुलसीदास, रामानंद, कबीर, गुजरातमधील नरसी मेहता, राजस्थानातील मीराबाई यांच्या काव्यरचनांत नामदेवांचा सन्मानपूर्वक उल्लेख आढळतो. पंजाबमध्ये शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबामध्ये नामदेवांच्या हिंदी भाषेतील ६१ पदांचा समावेश आहे. संत नामदेवांचे पंजाबमध्ये अमृतसरजवळ घुमान येथे मंदिर आहे. त्यांना पंजाबमध्ये अनेक शिष्य लाभले. बहोरदास, विष्णुस्वामी, जाल्लो, केसो, कलंधर इत्यादींचा त्यात समावेश होतो. त्यांची हिंदी भाषेतील रचना मनभावण ठरावी. तत्कालीन मराठी संतात हिंदी भाषेत रचना करणारे नामदेव हे विशेष उल्लेखनीय संत कवी ठरतात. एवढेच नव्हे तर ते हिंदी भाषेचे प्रवर्तक आहेत. अवधी, राजस्थानी, व्रज याही भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांच्याइतकी सर्वदूर भ्रमंती करणारा नि तरीही दीर्घायू जगलेला संत विरळाच.
नामदेवांच्या काव्यनिर्मितीत आशयाची विविधता आहे. “किस्ना संभालले संभाल अपुल्या गाई| आम्ही तर घरासी जातो भाई” असे बालकविता लिहिणारे नामदेव “हिंदु अन्हा तुरकू काना दोहीपे ज्ञानी सियाना | हिंदु पुजे देहुरा मुसलमान मसिद| नामा सेवे सवैया जहाँ देहू रा ना मशिद॥”
हे त्यांचे बुद्धिवादी बोल त्यांच्या प्रगल्भ, निर्भय नि निर्भीड वृत्तीचे द्योतक ठरावेत. तत्कालीन समाजाला चांगलेच प्रभावित करून गेलेले हे त्यांचे बोल आजही तेवढेच अंतर्मुख करणारे आहेत.
नामदेवांची कविता सहज, विविधांगी, उत्कट, हळुवार, कोमल, प्रासादिक अशा विविध रूपांत व्यक्त होते. स्थलकालपरिस्थितीचेही तिच्यात वास्तव दर्शन घडते. त्यांनी संस्कृत परंपरेला शह दिला. परमेश्वराचे गुणगाण व जनसामान्यांचे प्रबोधन, त्यांचे मतपरिवर्तन, जीवनातील हरले – हरवलेपण घालवून त्यांचा स्वाभिमान जागविणारी, मीचे आम्ही आणि आम्हीचे आपण करणारी सर्वसमावेशक, व्यापक भाव शब्दांकित करणारी ही कविता जनसाहित्याचे रूप ठरावी.
“आज सोनियाचा दिवस धन्य झाला| प्रत्यक्ष भेटला नामदेव॥”
या चोखामेळा यांच्या उद्गारातून आनंदभाव व्यक्त होतो. संत जनबाईसुद्धा नामदेवांविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करते.
जनाबाई, चोखामेळांसारख्या संतांना आपले मानणारे, त्यांना समाजाच्या प्रमुख धारेत आणण्यासाठी खस्ता खाणारे नामदेव तत्कालीन काळाच्या पार्श्वभूमीवर उत्तुंग व्यक्ती ठरतात.
मंगळवेढा येथे कुसाचे बांधकाम सुरू असताना अचानक कोसळलेल्या भिंतीच्या ढिगार्याखाली मजूर म्हणून राबणार्या चोखोबासह अनेकजण गाडले गेले. सर्वांचा दु:खद अंत झाला. कित्येक दिवसानंतर संत नामदेवांनी मंगळवेढ्याला जाऊन ढिगारा उपसून त्याखाली चोखोबांच्या अस्थी शोधून त्या पंढरपूरला आणल्या व विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात त्यावर चोखोबांची समाधी बांधली. हे आव्हानात्मक काम करणारे संत नामदेव असामान्य प्रतीचे संत ठरतात. यावरून त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट होते.
जनसामान्यांप्रमाणेच कित्येक श्रेष्ठतम संतांनीही त्यांच्याबद्दल समर्पक उद्गार काढले आहेत.
ज्ञानदेव म्हणतात,
“सिंधुहुनी सखोल| सरस तुझे बोल
आनंदाची ओल| नित्य नवी॥”
तर कबीर म्हणतात,
“गुरू परसादी त्रैदेव नामा| प्रगटिके प्रेम इन्ह हि कै जाना॥”
नामदेवांनी कित्येक मराठी शब्दांना व संज्ञांना हिंदी भाषेत महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. लाहिले, सेवीले, लागीले, भारविले, चाली, तुटसी, होई, आला चोखवा ही मराठी क्रियापदांची (कधी मूळ तर कधी बदलती) विविध रूपे त्यांच्या हिंदी कवितेत विखुरलेली आहेत.
मराठी माणसाला जसे नामदेव आपले वाटतात तसे हिंदी भाषिक भक्तही नामदेवांना जवळचे मानतात. हे भाषिक समायोजन नि ऐक्य असामान्यच म्हणावे लागेल.
नामदेव एक संत, भक्त, कवी, लोकशिक्षक आहेत. भक्तितत्त्व ते उलगडून दाखवितात. त्यांच्या भक्तिसुमनातून उलगडणारा सुगंध मनाला स्पर्शून जातो. त्यातील आर्तता हे त्यांचे स्वत:चे स्वतंत्र स्फुरण असून स्वयंपूर्ण आहे. त्यांचे अभंग उत्कट भावकाव्याचा एक ठेवा आहे. त्यांनी ज्ञानेश्वर चरित्र रसाळपणे शब्दबद्ध केले. त्याचबरोबर चोखामेळा, सावतामाळी, गोराकुंभार, जनाबाई, जगमित्र नागा यांचीही स्फुटचरित्रे लिहिली. चार भिंतींच्या मर्यादेतील कीर्तन त्यांनी मुक्तांगणात आणले. ‘नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावू जगी॥” या त्यांच्या उक्तीतून त्यांनी ज्ञानमहात्म्य प्रतिपादन केले.
ज्ञानेश्वरांपासून नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, राष्ट्रसंत तुकडोजींपर्यंतच्या संत कवितेत समतेचा अंत:प्रवाह झुळझुळत आहे. म्हणूनच “संत दिसती वेगळाले| परी ते स्वरूपी एकचि मिळाली” या उक्तीत सत्याची प्रतीती येते.
प्राचार्य डॉ. रामदास चवरे
२२०८, सी, आसावरी, नांदेड सिटी, पुणे ४११०६८
संवाद ८३०८९९८६७२
