You are currently viewing कोकण प्रवासाला नवी दिशा; मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा १ मार्चपासून सुरू

कोकण प्रवासाला नवी दिशा; मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा १ मार्चपासून सुरू

प्रवासाचा वेळ वाचणार; पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना

मुंबई :

मुंबई आणि कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर संपली असून बहुचर्चित मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा १ मार्चपासून नियमितपणे सुरू होणार आहे. मुंबईतील ‘भाऊचा धक्का’ ते सिंधुदुर्गातील विजयदुर्ग दरम्यान सुरू होणारी ही जलवाहतूक सेवा मुंबई–कोकण प्रवासाचे समीकरण बदलणारी ठरणार आहे.

या सेवेच्या वेळापत्रकानुसार, १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबईहून रो-रो बोट विजयदुर्गकडे रवाना होईल व दुपारी ३ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून बोट सुटेल आणि सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होईल. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रस्ते मार्गावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे या ऐतिहासिक पहिल्या प्रवासाचे साक्षीदार राहणार असून त्यांनी स्वतःचे तिकीट आरक्षित केले आहे. या रो-रो सेवेअंतर्गत प्रवाशांना आपल्या वाहनांसह समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे. त्यामुळे दक्षिण कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे.

या उपक्रमामुळे विजयदुर्ग परिसरातील अर्थव्यवस्था आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळून कोकणाच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा