कुडाळजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार दोन युवक जखमी
कुडाळ
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीक वेताळबांबर्डे येथे आज दुचाकी आणि चारचाकी कार यांच्यात भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या अपघातात दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, होंडा अमेझ ही कार कुडाळच्या दिशेने जात होती. त्याचवेळी हिरो एचएफ डिलक्स या दुचाकीवरून दोन युवक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत महामार्गावर विरुद्ध दिशेने येत होते. अचानक समोरून दुचाकी आल्याने कारचालकाला वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली.
या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडकेत कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारचालक या अपघातातून बचावले असून त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार युवक मद्यप्राशन करून वाहन चालवत असावेत, अशी चर्चा सुरू होती. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याच्या संशयामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
