*मधुभाई – साहित्य, समाज कृतज्ञता सोहळ्याचे रत्नागिरीत मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि कोमसापचे संयुक्त आयोजन*
रत्नागिरी:
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक अर्थात मधुभाई – साहित्य समाज कृतज्ञता सोहळा रत्नागिरी येथील वि. दा. सावरकर सभागृहात अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी नाम. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते मधुभाईंचा शाल श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपकार डॉ विश्वास पाटील, प्रा. अशोक बागवे, गीतकार अरुण म्हात्रे, कोमसाप अध्यक्षा सौ.नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ.प्रदीप ढवळ, रत्नागिरी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे तसेच प्रशासकीय अधिकारी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी सोहळ्याची सुरुवात सत्कारमूर्ती आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, डॉ.विश्वास पाटील, प्रा.अशोक बागवे, गीतकार अरुण म्हात्रे, सौ.नमिता कीर, प्रा. डॉ.प्रदीप ढवळ आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख अतिथी प्रा.अशोक बागवे, गीतकार अरुण म्हात्रे, डॉ.विश्वास पाटील, रत्नागिरी नगराध्यक्षा सौ.शिल्पा सुर्वे आदी मान्यवरांचा कोकण मराठी साहित्य परिषदच्या वतीने शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गोगटे जोगळेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत तसेच अभिजात मराठीच्या सन्मानार्थ “मी मराठी” हे सुमधुर गीत सादर केले. यावेळी मधुभाईंच्या सखोल जीवनाचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसापचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ.प्रदीप ढवळ यांनी तर सूत्रसंचालन सचिव माधव अंकलगे यांनी केले.
उद्घाटनपर कार्यक्रमानंतर सोहळ्याचा मुख्य गाभा म्हणजेच मधुभाईंच्या प्रकट मुलाखतीला सुरुवात करण्यात आली. ही मुलाखत घेण्यासाठी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी प्रा.अशोक बागवे, गीतकार अरुण म्हात्रे, प्रा.डॉ.प्रदीप ढवळ, सौ.नमिता कीर आणि निवेदक अभिजित हेगशेट्ये उपस्थित होते. यावेळी मुलाखतीची सुरुवात करताना प्रा. अशोक बागवे यांनी वंदन करणे म्हणजे काय..? हे स्पष्ट करताना “वदन जिथे झुकते ते वंदन” असे म्हणत आदरणीय मधुभाईंना वंदन केले आणि कोमसापची कल्पना कशी सुचली..? यावर त्यांना बोलते केले. मधुभाईंनी सुहास्य वदने उत्तर दिले…” आपण अ.भा. सा. संमेलनाचा अध्यक्ष झालो त्यावेळी कोकणातून केवळ दोन जणांना मतदान होते आणि केवळ बृहन्महाराष्ट्राच्या जोरावर आपण निवडून आलो होतो. भविष्यात कोकणातील दुसऱ्या कोणा साहित्यिकाला अशी अडचण येऊ नये, कोकणातून साहित्यिक निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने आणि आजपर्यंत अनेकांच्या पालख्या आपण उचलल्या आता आपली पालखी आपण उचलायची म्हणून आपण कोमसापची निर्मिती केल्याचे ते म्हणाले. आपण वाचलेल्या अनेक पुस्तकांमध्ये आपल्याला कोकण, शेती, आंबे, डोंगर माझे भंडारी, गाबीत बांधव कुठेच भेटली नाही म्हणून आपल्या मराठी साहित्यातून कोकणाचे वैभव उभे केल्याचे ते अरुण म्हात्रेंच्या प्रश्नावर उत्तरले.
लंडनमध्ये शेक्सपियरचे त्याच्या वस्तू जतन केलेले स्मारक पाहिले. त्यामधून प्रेरणा घेऊन आपले महान साहित्यिक केशवसुतांचे देखील स्मारक असावे या उद्देशाने लोकांकडून १०/१२ हजार रुपये देणगी गोळा करून केशवसुत स्मारकाची सुरुवात केली. मी ते उभारले नाही तर तुम्ही लोकांनी हळूहळू ते उभे केले आणि जे उभे राहिले आहे त्यात मी समाधानी आहे, असे सौ.नमिता कीर यांच्या प्रश्नावर ते बोलले.
अपयशाने मला यश दिले. जास्त काही न शिकलेल्या माणसाने नाथ पै ज्ञान प्रबोधिनी सुरू करून कणकवलीला परवड करून शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांसाठी गावात शिक्षणाची सोय केली कारण आपण १०/१२ किमी चालत जाऊन शिक्षण घेतले होते तशी इतरांची अवस्था होऊ नये असे ते प्रा.ढवळ यांच्या प्रश्नावर उत्तरले. नाथ पै सोबत कट्टा सुकळवाड भागात फिरताना भूक लागली असता एका म्हातारीच्या घरात नाथ पै यांनी पेज मागितली असता, नाथ पै हे नाव ऐकताच म्हातारीने चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवून आम्हा दोघांनाही गाडगेभर पेज करून वाढल्याची त्यांनी आठवण सांगितली यातून जुन्या राजकारण्यांवर लोकांचे किती प्रेम होते हे दाखवून दिले.
अभिजात मराठीवर बोलताना ते म्हणाले, आपण १ली ते १० वी ची पुस्तके वाचली. पहिलीच्या पुस्तकात पहिली दोन पाने चित्रच आहेत. मुलांना चित्र दाखवू नका, त्यांना शब्दांमधून त्याची कल्पना करू द्या. काही पुस्तकात “मी पाणी पिलो, जंगलात खूप हत्या पाहिले, मुर्त्या पाहिल्या….” अशाप्रकारचे अशुद्ध मराठी लिहिलेले आढळले. आजच्या शिक्षण व्यवस्थेवर ताशेरे ओढत मराठी भाषा मंत्री नाम.उदय सामंत यांना शुद्ध मराठी भाषा पाठ्यपुस्तकात असावी अशी प्रेमळ सूचना केली. यावर मंत्रीमहोदयांनी देखील आपण जे जे म्हणाल ते होईल असे आश्वस्त केले. मधुभाईंनी रॅपिड प्रश्नांची दिलेली अफलातून उत्तरे पाहता ९६ व्या वर्षाच्या उंबरठ्यावर देखील त्यांची बुद्धी आणि स्मृती किती विलक्षण आहे याची जाणीव झाली. गीतकार अरुण म्हात्रे यांनी सुरेश भटांची *”दे मजला जगण्याचे बळ अजून, उठते रे काळजात कळ अजून.”*…या गझलने प्रकट मुलाखतीची सांगता केली.
*”हा देवदूत कोणी खोदीत बसला तेजाची लेणी”* : डॉ.विश्वास पाटील
पानिपतकार डॉ.विश्वास पाटील यांनी मधुभाईंच्या संपूर्ण लेखन कार्यावर स्तुतीसुमने उधळली आणि “हा देवदूत कोणी खोदीत बसला तेजाची लेणी” असे गौरवोद्गार काढले. वयाच्या ९६ वर्षात ९० पुस्तकांचा प्रपंच हा आपल्या हयातीत आपल्याला पेलणार नाही असे सांगत डॉ.पाटील यांनी भाईंसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. भाईंनी त्यांच्या लेखनात जी भर घातली ती मराठी समीक्षकांना जोखायला देखील कमी पडणार असेही ते आपल्या मनोगतात म्हणाले.
यावेळी कोमसापचे जयू भाटकर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले तर रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी समाजाला दिशा देणारे मधुभाईंचे साहित्य असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले.
*”दोन मालवणी नाटकांनी मालवणी भाषा साता समुद्रापार गेली; एक गंगाराम गव्हाणकर यांचे “वस्त्रहरण” आणि मधु मंगेश कर्णिक लिखित “केला तुका झाला माका”: नाम.डॉ.उदय सामंत*
मधुभाई – समाज साहित्य कृतज्ञता सोहळ्यात मराठी भाषा मंत्री नाम. डॉ. उदय सामंत यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेण्याचे काम मच्छिंद्र कांबळी यांनी भूमिका केलेल्या व कोकणचे सुपुत्र गंगाराम गवाणकर यांनी लिहिलेल्या वस्त्रहरण या नाटकाने केलं यात वादच नाही परंतु, मालवणी भाषा सातासमुद्रापार नेण्याचं काम एक नव्हे तर दोन नाटकांनी केलं आणि ते दुसरं नाटक म्हणजे मधु मंगेश कर्णिक लिखित “केला तुका झाला माका” असे स्पष्ट विधान केले. या नाटकांमध्ये भूमिका कोणी केली हे जसं महत्त्वाचं आहे तसंच ते लिहिलं कोणी हे देखील महत्त्वाचे आहे. आपल्या या भूमिकेवर कोणीतरी वाद देखील करतील परंतु, आपण नेहमीच स्पष्ट बोलतो आणि महाराष्ट्रभरचे वाद आपण सोडवतो त्यात असा छोटासा वाद झाला तर तो सोडविण्यासाठी सुद्धा आपण तयार असल्याचे ते म्हणाले. काश्मीरला सुद्धा मराठी भाषेचे गाव करतो आहोत तसेच जेएनयु मध्ये कुसुमाग्रजांच्या नावे मराठीचे अध्यापन केंद्र सुरू केलं असून जेएनयुची मुले शिवाजी महाराजांच्या गनिमीकाव्यावर डॉक्टरेट करतात, याचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला. काहीच दिवसात नाशिक येथे होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात अनुवाद अकादमी स्थापन करण्याचा निर्णय देखील मराठी भाषा मंत्रालयातर्फे आपण घेत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे परदेशातील मुलांना ऑनलाइन मराठी शिकविण्यासाठी उपक्रम देखील लवकरच सुरू करत असल्याबाबत माहिती दिली. राजकारणात नाना दंडवतेंच काम जेवढं अनमोल आहे तेवढेच साहित्य क्षेत्रात मधुभाईंचं काम अतुलनीय असे आहे, असे गौरवोद्गार नाम.सामंत यांनी काढले व मधुभाई सांगतील तशी कोमसाप भविष्यात पुढे जाईल असे आश्वस्त केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मधुभाईंनी नाम.उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनांसाठी त्यांचे आभार मानले व सावंतवाडी, वेंगुर्ला ते डहाणू पर्यंत १३ बोलीभाषा बोलल्या जातात, तरीसुद्धा मराठी ही एक आहे. आमची आई मराठी आणि बाप महाराष्ट्र आहे. आम्ही आंबा काजू वर खुश आहोत, तुम्ही द्राक्ष, डाळिंब इथे लावण्याचा प्रयत्न करू नका अशी हात जोडून विनवणी करत मधुभाईंनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या भविष्यातील वाटचालीबाबत दिशा दाखविली.
कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वितेसाठी नाम.डॉ.उदय सामंत, कोमसापच्या अध्यक्षा सौ नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा डॉ प्रदीप ढवळ, रत्नागिरी जिल्ह्याचे कोमसाप मंडळ, मराठी भाषा मंत्रालय, जिल्हा प्रशासन रत्नागिरी यांनी अतुलनीय योगदान दिले. सचिव माधव अंकलगे यांनी सर्वांचे आभार मानले.
