*तेल ही गेले तूप ही गेले….धगधगते चिन्ह घेऊन उभा राहिलेल्या उमेदवाराच्या हाती धुपाटणे राहिले*
*सावंतवाडी शेजारील गावातील पंचायत समिती उमेदवार अदृश्य शक्तीच्या फसव्या आश्वासनांचा बळी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. यावेळच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकांच्या लक्षात राहतील एवढ्या गाजल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीत गाजलेला हजारो रुपयांत मतदार खरेदी हा पॅटर्न मागे पडला आणि नव्याने बिनविरोध निवडणूक हा ट्रेंड जन्माला आला. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मतदारांना पैसे वाटप करणे, एवढे करूनही विरोधकांनी जास्त पैसे वाटले तर..? ही भीती वारंवार सतावणे, मतदान करण्यासाठी हाजीहाजी करणे, दिवस रात्र जेवणावळी, उन्हातान्हात प्रचार आणि होणारी दमछाक यातून सुटका करून घेण्यासाठी विरोधी उमेदवारच खरेदी करून निवडणूक बिनविरोध करण्याचा नवा ट्रेंड आला त्यामुळे भारतीय लोकशाहीच धोक्यात आली असल्याचे दिसून येत आहे.
सावंतवाडी शहराच्या बाजूच्या गावातील असाच एक पंचायत समितीचा उमेदवार अलीकडेच उदय होत असलेला युवा नेत्याच्या अदृश्य शक्तीच्या फसव्या आश्वासनांचा बळी पडला आणि स्वतःकडील असले नसलेले पैसे, पत्नीचे दागदागिने देखील गमावून बसला. अदृश्य शक्तीच्या नेत्याच्या गोऱ्या वर्णाच्या दोन साथीदारांनी सावंतवाडीतील बाळकृष्ण कोल्ड्रिंक्सच्या मागे बोलावून “तू निवडणुकीला उभा रहा, तुझा संपूर्ण खर्च आम्ही करतो” असे आश्वासन दिले. या अदृश्य शक्तीच्या आश्वासनामुळे त्या उमेदवाराने स्वतः कडचे पैसे तर संपलेच पण घरातले बायकोचे दागिने सुद्धा गहाण ठेऊन घेतलेले पैसे निवडणुकीच्या डावावर लावले. एवढेच नव्हे तर दुसऱ्या एका विरोधी उमेदवाराकडून फॉर्म मागे घेण्यासाठी आलेली 7.00 लाखांची ऑफर धुडकावली. परंतु, शेवटी त्या युवा नेत्याच्या अदृश्य शक्ती असलेल्या गोऱ्या साथीदारांनी त्या उमेदवाराचा खर्च न करता सर्व शक्तिनिशी जित दर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहिले. त्यामुळे धगधगती निशाणी घेऊन उभा असलेला हा उमेदवार “तेलही गेले आणि तूपही गेले हाती राहिले धुपाटणे” अशा परिस्थितीत फसला.
तालुक्यात बरेच अपक्ष निवडून आले, काही अपक्ष तोंड बघत राहिले तर काही फॉर्म मागे घेत स्वतःच्या पक्षाला सुद्धा फसवून अदृश्य शक्तीच्या साथीने मालामाल झाले. त्यामुळे अदृश्य शक्तीने तालुक्यातील जिंकणाऱ्या घोड्यांवर पैसे लावले आणि कमजोर घोड्यांना फक्त चारा दाखवून फसवले अशी चर्चा तालुक्यातील काही उमेदवारांचे जवळचे चेले करीत आहेत.
