You are currently viewing जिव्हाळा सेवाश्रमचा दहावा वर्धापनदिन १४ फेब्रुवारीला

जिव्हाळा सेवाश्रमचा दहावा वर्धापनदिन १४ फेब्रुवारीला

जिव्हाळा सेवाश्रमचा दहावा वर्धापनदिन १४ फेब्रुवारीला

‘जिव्हाळा गौरव पुरस्कार’ प्रदान होणार

कुडाळ

सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या वतीने गेल्या दशकभरापासून वृद्धांची निस्वार्थ सेवा केली जात आहे. संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा मान्यवरांना ‘जिव्हाळा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जिव्हाळा सेवाश्रम, म्हाडयाचीवाडी-रायवाडी येथे पार पडणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुरेश उर्फ दादा बिर्जे यांनी दिली.
श्री. बिर्जे यांनी सांगितले की, सेवाश्रमामध्ये सध्या २५ वृद्ध लाभार्थी वास्तव्यास असून त्यांच्या संगोपन, आरोग्य आणि दैनंदिन गरजांची जबाबदारी संस्था सातत्याने पार पाडत आहे. वर्धापनदिनानिमित्त दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता चि. अन्वेष बिर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त लाभार्थ्यांना फळवाटप करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता आरोग्यविषयक फिजिओथेरपी शिबिर होईल.
दुपारी २ वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम असून दुपारी ३ वाजता मान्यवरांच्या हस्ते ‘जिव्हाळा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येतील. यावर्षी अभिनेत्री सौ. श्रद्धा खानोलकर, पत्रकार अजय सावंत, शिक्षक माणिक पवार, केदार देसाई, वैशाली देसाई, प्रसाद परब, रवी कुडाळकर, उदय आईर, नितेश तांबे आणि साक्षी शेल्टे यांचा कला, क्रीडा, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान होणार आहे.
या सोहळ्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व अ‍ॅड. अनिल बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, माडयाचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, उपसरपंच अस्मिता गावडे, माजी सरपंच सचिन गावडे, गोव्याचे उद्योजक सुरेश मोरजकर, संतोष शेटगावकर, मोहन आरावंदेकर, रामकृष्ण सामंत, पीटीओ प्रशांत केरवडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता योगेश प्रभू आणि आनंद मोर्ये यांचा सुगम संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी ६ वाजता वाढदिवस समारंभाची सांगता होईल. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुरेश बिर्जे, उपाध्यक्ष राजू बिर्जे तसेच विश्वस्त व सल्लागार समिती सदस्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा