You are currently viewing आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत सुमारे आठ लाख भाविकांचे दर्शन
Oplus_16908288

आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत सुमारे आठ लाख भाविकांचे दर्शन

महाप्रसादाचा सोहळा, देवीचा गजर आणि काटेकोर नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शन; राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी

आंगणेवाडी (प्रतिनिधी) :

ध्वनीक्षेपकावर सुरू असलेला देवीचा गजर, महाप्रसादाच्या ताट्यांचा सोहळा पाहण्यासाठी देवालयाच्या प्रांगणाबाहेर उसळलेली भाविकांची गर्दी—असा भव्य नजारा सोमवारी रात्री आंगणेवाडी येथे पाहायला मिळाला. महाप्रसाद ताटे लावण्याच्या कार्यक्रमासाठी रात्री ९.५० वाजता बंद झालेली दर्शन रांग रात्री १.०० नंतर पुन्हा सुरू करण्यात आली. सकाळच्या सत्राबरोबरच सायंकाळीही भाविकांनी उच्चांकी गर्दी अनुभवली. मंगळवारीही भाविकांच्या ओघाने यात्रा परिसर फुलून गेला.

‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रोत्सवाची सांगता मंगळवारी सायंकाळी उत्साहात झाली. दोन दिवसांत सुमारे आठ लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. मंगळवारी सायंकाळनंतरही मंदिर परिसरातील दर्शन रांगांमधील भाविकांचा ओघ सुरूच होता.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कुटुंबियांसह देवीचे दर्शन घेतले. तसेच पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार आशिष शेलार, दीपक केसरकर, माजी खासदार विनायक राऊत, वरुण सरदेसाई, माजी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, संजय पडते, साक्षी वंजारी, राजन तेली, संजय आंग्रे, मेघनाद धुरी, इर्शाद शेख, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, आमदार कालिदास कोळंबकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बंड्या सावंत यांच्यासह मुंबईतील शिवसेना, ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक, भाजपचे अनेक स्थानिक नेते-पदाधिकारी आणि सिने-कलावंतांनी आई भराडी देवीचे दर्शन घेतले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी मंगळवारी देवीचे दर्शन घेतले.

मंगळवारी आंगणे ग्रामस्थांनी देवीचे दर्शन घेऊन ओट्या भरल्या. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या वतीने भक्तांसाठी नवस बोलणे, फेडणे व ओटी भरणे हे विधी सायंकाळपर्यंत सुरू ठेवण्यात आले. यात्रोत्सवातील महत्त्वाचा महाप्रसाद ताटे लावण्याचा कार्यक्रम शनिवारी रात्री ९.५० वाजता सुरू झाला. प्रथम मानकऱ्यांची ताटे सवाष्ण महिलांकडून देवीच्या प्रांगणात डोक्यावरून आणण्यात आली; त्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या घरांत बनविलेल्या ताट्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

ताटे लावण्याच्या वेळी देवालयाच्या मागील प्रांगणात सवाष्ण महिलांचा मोठा मेळा भरला होता. सायंकाळनंतर गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली आणि मध्यरात्रीनंतर देवालयाबाहेरील रस्त्यावरून चालणेही अवघड झाले. दोन दिवसांत यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. मनोरंजन विभागात खेळण्यांच्या भागात बालकांची विशेष गर्दी दिसून आली. मोड जत्रेत शेतीची अवजारे व गृहपयोगी साहित्य खरेदीस चांगला प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बचतगटांच्या स्टॉलनाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यात्रेत सेवा दिलेल्या शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांचे आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. एकूण नऊ दर्शन रांगांद्वारे व्यवस्था करण्यात आल्याने आणि योग्य नियोजनामुळे भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळत होते. कुठलीही रांग खोळंबलेली दिसली नाही. ठिकठिकाणी लावलेल्या ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने स्वागत कक्षातून बाबू आंगणे व बाळा आंगणे वेळोवेळी सूचना देत होते. ही संपूर्ण व्यवस्था आंगणे कुटुंबीय व रोहन व्हिडिओ कॉम्प्युटेक, मुंबईचे अनंत आंगणे यांच्या वतीने करण्यात आली होती. सायंकाळनंतर आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा