सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीकडून १८० रुपयांनी काजू खरेदी सुरू
शेतकऱ्यांना गरजेपुरतीच विक्री करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीमार्फत गेल्या वीस दिवसांपासून सभासद शेतकऱ्यांची काजू खरेदी सुरू आहे. बाजारात ज्या वेळी काजूचा दर १५० रुपये प्रतिकिलो जाहीर करण्यात आला, त्याच वेळी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत कंपनीने पुढाकार घेत १८० रुपये प्रतिकिलो दराने काजू खरेदी सुरू केली आहे.
काही सभासद शेतकऱ्यांनी २०० रुपये प्रतिकिलो दराने काजू खरेदी करण्याची मागणी केली होती. मात्र सध्याची बाजारस्थिती, परदेशातून येणारी काजूची आवक आणि एकूणच काजू बाजारातील परिस्थिती लक्षात घेता सुरुवातीला १८० रुपयांनी काजू खरेदी करणे अपरिहार्य ठरल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
कंपनीकडून सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करण्यात आली आहे की, तातडीच्या गरजेपुरताच काजू विकावा आणि उर्वरित काजू साठवून ठेवावा. बाजारात काजूची आवक कमी झाल्यानंतर बाजाराच्या नियमानुसार दर वाढण्याची शक्यता असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो.
गेल्या वर्षी १ फेब्रुवारी रोजी कुंब्रल गावचे सरपंच श्री. अमित सावंत, त्यांचे काका श्री. उत्तम सावंत व इतर शेतकऱ्यांकडून सुमारे ९ क्विंटल काजूची खरेदी करण्यात आली होती. यंदाही दिनांक ६ फेब्रुवारी रोजी अमित सावंत यांच्या कुटुंबातील श्री. उत्तम सावंत, श्री. राजाराम सावंत, श्री. जयानंद सावंत आदींकडून १८० रुपये दराने १२ क्विंटल काजूची खरेदी करण्यात आली.
दर स्थिर राहावा आणि भविष्यात शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी फक्त गरजेपुरतीच काजू विक्री करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे स्नेहांकित श्री. विलास सावंत (डिंगणे) यांनी केले आहे.
