आयात शुल्कात कपातीपाठोपाठ आता डॉलरचे दरही कमी होऊ लागल्याने सोने-चांदीत चांगलीच घसरण होत आहे. यात शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ४६ हजार ९०० रुपयांवर आले. तर चांदीतही एक हजार ८०० रुपयांनी घसरण होऊन ती ६८ हजार ७०० रुपयांवर आली आहे. नऊ महिन्यांनंतर सोने पुन्हा ४७ हजारांच्या खाली तर सहा महिन्यांनंतर चांदी ६९ हजारांच्या खाली आली आहे.
लॉकडाऊन असले तरी गेल्या वर्षी मे महिन्यात बाजारात उलाढाल होऊन सोने-चांदीचे भाव वाढत गेले. दिवाळीपर्यंत ही भाववाढ कायम राहत त्यानंतर भाव कमी-कमी होऊ लागले. आता अर्थसंकल्पात आयात शुल्कात अडीच टक्क्यांनी कपात झाली व तेव्हापासून भाव कमी होत गेले.
किरकोळ वाढ वगळता घसरण कायम
अर्थसंकल्पानंतर मध्यंतरी किरकोळ भाववाढ वगळता सोने-चांदीत घसरण कायम आहे. यात शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी सोने नऊ महिन्यांच्या नीचांकीवर गेले. १८ रोजी ४७ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १९ रोजी ४०० रुपयांची घसरण होऊन ते ४६ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले. या पूर्वी ७ मे २०२० रोजी सोने ४६ हजार रुपयांवर होते. त्यानंतर त्यात हळूहळू वाढ होत जाऊन ५ जून २०२० रोजी ते ४७ हजारांच्या पुढे गेले व सोन्याचे भाव ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळा झाले. त्यानंतर ही भाववाढ कामय राहिली.