१० वी – १२ वीच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रेरणादायी आवाहन!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आवाहन केले आहे.
प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
सप्रेम नमस्कार.
येत्या १० फेब्रुवारीपासून बारावीची आणि २० फेब्रुवारीपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. त्यापूर्वी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षाही होणार आहेत. तुमच्या आयुष्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आठवणीत राहणारा टप्पा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही, तुमचे शिक्षक आणि तुमचे आई-वडील एकाच ध्येयाने प्रयत्न करत आहात.
परीक्षेसाठी आता थोडाच कालावधी शिल्लक आहे, स्वतःचे अभ्यासाचे वेळापत्रक बनवा, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा भरपूर सराव करा, शंका आपल्या मार्गदर्शक शिक्षकांना जरूर विचारा. लेखी परीक्षा इतकेच तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेलाही महत्त्व द्या, गांभीर्याने घ्या.
मित्रांनो, जेव्हा तुम्ही परीक्षेला सामोरे जाता, तेव्हा तुमच्या हातात केवळ उत्तरपत्रिका नसते, तर तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्ने आणि त्यांनी तुमच्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांची शिदोरी असते. यश हे नेहमी ‘मिळवलेले’ असावे, ते कधीही ‘चोरलेले’ नसावे. जेव्हा आपण स्वकष्टाने एखादे यश मिळवतो, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण जर आपण चुकीच्या मार्गाचा म्हणजे कॉपीचा अवलंब केला, तर मिळवलेले गुण कदाचित कागदावर दिसतील, पण तुमच्या आत्मविश्वासाला मात्र कायमची तडा जाईल.
लक्षात ठेवा, ‘कॉपी’ तुमची बुद्धी वाढवू शकत नाही, ती फक्त तुमची हिंमत मारते. तुम्ही वर्षभर जो अभ्यास केला आहे, त्यावर श्रद्धा ठेवा. तुम्हाला सर्व काही आठवणार आहे, हा सकारात्मक विचार मनात ठेवा.
तुम्ही या देशाचे भविष्य आहात. तुमची प्रामाणिकता हीच तुमची खरी ओळख आहे. कोणत्याही गैरप्रकाराला बळी न पडता, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून ही परीक्षा द्या. कष्टाने मिळालेले ‘दोन गुण’ हे चोरी करून मिळवलेल्या ‘दहा गुणांपेक्षा’ नेहमीच श्रेष्ठ असतात. तुमच्या कष्टाला यशाची फळे नक्कीच मिळतील. कोणत्याही दडपणाशिवाय, हसतमुख चेहऱ्याने परीक्षेला सामोरे जा.
तुम्हा सर्व लाडक्या मित्र-मैत्रिणींना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!
– आपली
– तृप्ती धोडमिसे (भा. प्र. से.)
– जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
