You are currently viewing कणकवलीच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय सन्मान

कणकवलीच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय सन्मान

कणकवलीच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय सन्मान : ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांना ‘नालंदा गौरव पुरस्कार २०२५’ जाहीर

कणकवली

लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक कार्यशैली आणि विकासाभिमुख निर्णयांच्या माध्यमातून ग्रामपंचायत क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे कणकवलीचे सुपुत्र तथा शिरवडे गावाचे ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांना राज्यस्तरीय ‘नालंदा गौरव पुरस्कार २०२५’ जाहीर झाला असून, त्यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौरवाची भावना निर्माण झाली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक १४ रोजी पुणे येथील पुणे पत्रकार भवन येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे.
नालंदा ऑर्गनायझेशनच्या वतीने दरवर्षी शिक्षण, कला, आरोग्य, सामाजिक, राजकीय, उद्योग, कृषी, क्रीडा, अध्यात्म, पत्रकारिता, युवा, महिला तसेच आदर्श ग्रामपंचायत अशा विविध क्षेत्रांत समाजासाठी भरीव आणि सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात येतो. समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान केला जातो.

सचिन पवार यांनी ग्रामपंचायत प्रशासनात कार्यरत असताना लोकाभिमुख सेवा, वेळेत निर्णयप्रक्रिया, विकासकामांचे प्रभावी नियोजन तसेच शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर दिला. त्यांच्या कार्यकाळात ग्रामविकासाशी संबंधित अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले असून, प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता आणि नागरिकांशी थेट संवाद ही त्यांची कार्यशैलीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नालंदा ऑर्गनायझेशनने सचिन पवार यांची ‘नालंदा गौरव पुरस्कार २०२५’ साठी निवड केली आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ तसेच शाल-फेटा असे असून, मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रामस्थ, सहकारी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच कणकवली तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध स्तरांतून सचिन पवार यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील कार्यातूनही ग्रामपंचायत प्रशासनात नवे आदर्श निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा