ट्रॅक्टर व स्कूटरच्या धडकेत तरुण गंभीर जखमी!
मालवण
बेळणे मार्गावर मसदे गावडेवाडी येथे ज्युपिटर स्कुटर व ट्रॅक्टर यांच्यात आलेल्या अपघातात दुचाकी धारक गंभीर जखमी झाला आहे. श्रावण येथून मसुरे येथे आपल्या वडिलांना आणायला जात असताना स्कूटर वरील ताबा सुटून ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने स्वप्निल बापू दळवी (४२) रा.श्रावण दळवीवाडी ता.मालवण हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी ४:४५ वा. च्या दरम्यान मसदे गावडेवाडी येथे घडली. अपघातग्रस्त गंभीर तरुणाला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. घटना स्थळा वरून मिळालेल्या माहिती नुसार श्रावण येथील तरुण स्वप्निल दळवी हा आपले वडील बापू दळवी यांना मसुरे येथून आणण्यासाठी आपली प्लेजर स्कूटर {MH 07 V 0119} ने जात असताना मसदे गावडेवाडी येथे कर्नाटक येथील ट्रॅक्टर क्रमांक (KA 28 TE 4322) हा ट्रॅक्टर घेऊन चालक चाफेखोल येथून पोईप येथे जाताना स्कूटर वरील ताबा सुटल्याने स्वप्निल दळवी हा ट्रॅक्टरच्या पुढील भागाला जोरदार धडकल्याने रस्त्यावर पडला. यावेळी त्याच्या नाकात तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जाग्यावरच अत्यवस्थ झाला. याबाबत माहिती मिळताच माजी जि. प.बांधकाम सभापती अनिल कांदळकर व इतरांनी रुग्णवाहिका आणून स्वप्निल याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तपासणीअंती त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची खबर मसदे पोलीस पाटील निनाद माड्ये यांनी मालवण पोलीस स्थानकात दिल्यावर मालवण पोलीस स्थानकाचे पीएसआय संदीप खाडे, पोलीस कॉन्स्टेबल राजाराम तेरेखोलकर, होमगार्ड कर्मचारी राहुल कदम, यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व अपघात ग्रस्त दोन्ही वाहने पुढील कारवाईसाठी मालवण पोलीस स्थानकात जमा करण्यात आली. अपघात प्रसंगी अनिल कांदळकर, दयानंद प्रभूदेसाई, विलास पांजरी, पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब, बिजू वंजारे, समीर हडकर, जितेंद्र परब, चेतन पाटकर, व इतरांनी सहकार्य केले.
