You are currently viewing मालवणात ५८.९० टक्के मतदान…

मालवणात ५८.९० टक्के मतदान…

मालवणात ५८.९० टक्के मतदान…

जिल्हा परिषदेच्या १३, पंचायत समितीच्या २९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद…

मालवण

तालुक्यातील राजकीय भवितव्याचा फैसला आज मतदान यंत्रांत बंद झाला आहे. तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समिती मतदारसंघांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये कमालीची शांतता आणि निरुत्साह दिसून येत असतानाच दुपारनंतर मात्र मतदानाचा ओघ वाढला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी ५८.९० टक्के मतदान झाले असून आता सर्वांचे लक्ष ९ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. अनेक गावांतील मतदार विविध कारणांमुळे नाराज असल्याचे चित्र होते. ज्याचा परिणाम आकडेवारीवरही दिसून आला. दुपारी १ वाजेपर्यंत केवळ २० टक्के इतकेच मतदान झाले होते. मात्र जसजसा दिवस मावळू लागला तसे मतदारांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली. सायंकाळी ३ वाजेनंतर मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या. साडेतीन वाजेपर्यंत हा टक्का ४७ वर पोहोचला आणि शेवटच्या टप्प्यात सरासरी ५८.९० टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली.
ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने चोख नियोजन केले होते. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. तसेच तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. सर्वच मतदान केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे संपूर्ण तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली.
६ जिल्हा परिषद जागांसाठी १३, तर ११ पंचायत समिती जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात होते. ठाकरे शिवसेना विरुद्ध महायुती यांच्यात थेट चुरस पहावयास मिळाली. येत्या ९ तारखेला शासकीय तंत्रनिकेतन येथे निकाल जाहीर होणार आहे.
या निवडणुकीत ठाकरे शिवसेना आणि महायुती यांच्यात प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळाली. राजकीय वातावरण तापलेले असताना आता मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे, हे ९ तारखेला स्पष्ट होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा