पालकमंत्री नितेश राणेंच्या मागणीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मान्यता
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात नोकरीनिमित्त कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी गोवा राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी जाहीर करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील विविध खाजगी कंपन्या व आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या दिवशी सुट्टी मंजूर केली आहे. याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक-युवती तसेच इतर नागरिक रोजगारासाठी गोवा राज्यात कार्यरत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली होती. यासंदर्भात प्रत्यक्ष भेटीद्वारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा देखील करण्यात आली होती. त्या चर्चेनंतर ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे गोव्यात कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मतदारांना आपला लोकशाही हक्क बजावण्याची संधी मिळणार असून, त्यांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
