*मतदान म्हणजे केवळ हक्क नव्हे तर लोकशाहीप्रती कर्तव्य -प्राची पाटील*
*सायकल रॅलीतून लोकशाहीचा संदेश; घारपी शाळेचा मतदान जनजागृतीचा प्रेरणादायी उपक्रम*
*बांदा*
पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,घारपी यांच्या वतीने स्काऊट गाईड व कब बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून सायकल रॅलीद्वारे व्यापक मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. ग्रामीण भागात मतदानाबाबत जनजागृती वाढविणे, लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे तसेच शंभर टक्के मतदान हे उद्दिष्ट साध्य करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
या अभियानाची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून करण्यात आली. मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांच्या हस्ते सायकल रॅलीला उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी स्वीप नोडल अधिकारी प्राची पाटील व स्वीप सहाय्यक नोडल अधिकारी तुकाराम मोरजकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी “माझा मत – माझा अधिकार”, “लोकशाही बळकट करूया, मतदान करूया”, “लक्षात ठेवा लक्षात ठेवा ७फेब्रुवारी लक्षात ठेवा”अशा अर्थपूर्ण घोषणांचे फलक हातात घेतले होते.
शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या रॅलीने गावातील प्रमुख रस्ते, चौक, वाड्या-वस्त्या यांमधून फेरी काढत संपूर्ण परिसरात मतदानाबाबत जनजागृती केली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत मतदानाचे महत्त्व पटवून दिले. काही ठिकाणी लोकशाही विषयक घोषणा देण्यात आल्या, तर काही ठिकाणी नागरिकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यास प्रवृत्त करण्यात आले. वृद्ध, महिला तसेच तरुण मतदारांनी विद्यार्थ्यांच्या या समाजप्रबोधनात्मक उपक्रमाचे कौतुक करत आगामी निवडणुकीत आवर्जून मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना स्वीप नोडल अधिकारी प्राची पाटील म्हणाल्या, “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजावला पाहिजे. मतदान म्हणजे केवळ हक्क नव्हे, तर लोकशाहीप्रती असलेले आपले कर्तव्य आहे.”
स्वीप सहाय्यक तुकाराम मोरजकर आपल्या मनोगतात सांगितले की, “लोकशाही ही केवळ मतदानाच्या दिवशीची प्रक्रिया नसून ती रोजच्या जीवनात जपली जाणारी मूल्यव्यवस्था आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच नागरिकत्वाची जाणीव निर्माण झाली, तर उद्याचे सजग व जबाबदार मतदार घडतील. त्यामुळे शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता समाजप्रबोधनाचे केंद्र बनणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रतिनिधी, पालकवर्ग तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले यावेळी ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे,शिवराम गावडे, जयदेव गावडे,विलास गावडे, मधुकर गावडे, विठ्ठल गावडे, नामदेव गावडे, हरिश्चंद्र गावडे, रूपेश कविटकर, अजित असनोडकर, पोलीस पाटील समृद्धी गावडे, आशा सेविका उत्तरा नाईक, अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर, संचिता सावंत आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
या मतदान जनजागृती अभियानामुळे घारपी गावात निवडणुकीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी घारपी शाळेने उचललेले हे पाऊल इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक जे.डी.पाटील , मतदान केंद्रस्तरीय अधिकारी धर्मराज खंडागळे, आशिष तांदुळे मुरलीधर उमरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

