You are currently viewing सामाजिक जाणिवांचा कलश – अमृतघट

सामाजिक जाणिवांचा कलश – अमृतघट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित “अमृतघट” काव्यसंग्रहाचे प्रशांत वाघ यांनी केलेलं परीक्षण*

 

*सामाजिक जाणिवांचा कलश – अमृतघट*

 

नाशिकच्या कवयित्री प्रा. सौ सुमती पवार यांचा अमृतघट हा कविता संग्रह नुकताच वाचनात आला. अतिशय साध्या आणि अंतर्मनाला भिडणाऱ्या कविता वाचून या संग्रहातून कवयित्रीची जीवनाकडे बघण्याची दृष्टी लक्षात येते. प्रत्येकाच्या जीवनातील दैनंदिन येणारे काही अनुभव कवयित्रीने आपल्या कवितांमधून गुंफले आहे. आपल्या मातापित्यांना आदरपूर्वक हा कवितासंग्र्ह अर्पण करून कवयित्रीने आईवडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. आज आपण या संग्रहातील कवितांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

 

हिंदूधर्म संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्याची सुरुवात करायाची असेल तर प्रथमतः श्री गणेशाचे स्तवन करून, पूजा करून कार्य केले जाते. गणेशजी हे कार्यसिद्धीचे आद्यपुजक मानले आहेत. विघ्नहर्ता गणरायाचे स्मरण करून आपल्या आयुष्यात चांगले कर्म करून ते परमेश्वराला अर्पण करावे. अशी आर्जव करून कवयित्रीने गणरायाच्या आगमनाचे वर्णन करतांना गणराया कवितेते म्हटले आहे की –

विघ्नहर्त्या देवा तुझे , नाम रोज घ्यावे,

कर्म केले आम्ही, ते तुलाच अर्पावे.

 

निसर्गाने मानवांना खूप मोठी देणगी दिली आहे. सतत कार्यरत रहावे, इतरांना नेहमी आनंद देण्याचा प्रयत्न करावा, आपल्याकडून होईल तेवढे इतरांना देत जावे, तेही अविरत. आणि हे देण्याचे कार्य न थांबता करायला हवे , जो थांबला त्याचा कार्यभाग बुडाला अशा उक्तीप्रमाणे सतत कार्य करीत राहिले पाहिजे हा निसर्गाचा नियम आहे. जर हवेने थांबले तर, प्राणवायू मिळणार नाही, जर सूर्याने थांबून घेतले तर चराचरातून प्रकाश नष्ट होईल म्हणून निर्सगाकडून मिळणारा हा संदेश मानवाने जपला पाहिजे , म्हणूच कवयित्री थांबला तो संपला या कवितेतून मानवाला संदेश देतात की –

थांबला तो संपला हो, थांबू नका कधी,

सांगा बरे काय होईल थांबता उदधी?

सूर्य थांबता धराच धाराशाई होईल,

आप तेज वायू चराचर नष्ट होईल.

 

निसर्गातून समाजाला खूप मोठा संदेश मिळत असतो, जसे निवडुंगाचे लाल फळे गोड असली तरी त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला काटे असतात, शेतीचे संरक्षण करण्यासाठी कडाने साबरकांडे असतात, गुलाबाला देखील काटे असतात.. म्हणजेच निसर्गातील अशा वनस्पती सहजासहजी कुणाला हात लावू देत नाहीत. सध्या समाजात विकृतीने कळस गाठला आहे, पाच वर्षाच्या मुलीपासून तर ६० वर्षाच्या वृद्धापर्यंत अनेक मुली स्त्रीया बलात्काराच्या बळी ठरत आहेत, समाजात स्त्रीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत चालली आहे. अशाच आशयाची काटेरी कुंपण या कवितेतून कवयित्रीने समाजातील मुलींना एक संदेश दिला आहे. मुली जोवर आपल्या आईवडिलांच्या घरी आहेत तोवर आपले वडील आपल्या हितासाठी काटेरी कुंपण असतात, वडील पाठीशी उभे असल्याने तुम्ही सुरक्षित राहू शकता.. स्वतः स्वतःचे संरक्षण करायला हवे आणि म्हणूनच कवयित्री म्हणतात की –

नजर पाप्याची लेकीवर फणा काढून उभा ठाकतो,

कुंपण बनूनी बाप सदोदित लेकीसाठी उभा राहतो

 

अमृतघट या कवितासंग्रहात एकूण १२० कवितांचा समवेश असून सर्वच कविता अगदी साध्या, आणि जशा मनात आल्या तशाच कागदावर आल्या आहेत. कवयित्री धार्मिक वातावरणात वावरणाऱ्या असल्याने त्यांच्या कवितांमधून परमेश्वरावरील भक्तीभाव दिसून येतो, गणपती देवा, ज्ञानदेव, श्रीराम, पांडुरंग पांडुरंग, देवदेव, राम नाम, स्वामीनाम इंद्रायणीच्या पाण्यात, पांडुरंग, या कवितांमधून भक्तीभाव दिसून येतो. याबरोबरच कवयित्रीने समाजाचे निरीक्षण करून सामाजिक भावनांचा परामर्श घेण्यासाठी थांबला तो संपला, बाप, काटेरी कुंपण, अरे मानवा, ह्या मातीतून, जग वेड्याचं, उगाच काही बोलू नका या कवितांमधून सामाजिक आशयाची पेरणी करून कवयित्रीने सामाजिक जाणिवा संपन्न केल्या आहेत

 

आईवडिलांच्या परम स्मृतींना ही कलाकृती अर्पण करून कवयित्रीने आईवडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे, प्रा. सौ. सुमती पवार यांचा साहित्यिक व्यासंग दांडगा असल्याने त्यांनी विविध विषयावर एकूण तीस साहित्य कलाकृती निर्मिती करून साहित्य क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि यात आपल्या प्रकाशन संस्थेचाही समावेश व्हावा म्हणून पुण्याचे वैशाली प्रकाशन यांनी या कलाकृतीचे प्रकाशन करून वाचकांच्या हवाली केले आहे. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार दीपक दंडवते यांनी या कलाकृतीला आकर्षक मुखपृष्ठ देवून कलाकृतीच्या वैभवात भर घातली आहे.

 

 

 

प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)

संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)

 

कलाकृती परिचय:

कलाकृती – अमृतघट

साहित्य प्रकार – कवितासंग्रह

कवयित्री – प्रा. सौ. सुमती पवार, नाशिक

संपर्क क्रमांक – ९७६३६ ०५६४२

मुखपृष्ठचित्रकार- दीपक दंडवते

प्रकाशक : वैशाली प्रकाशन, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा