You are currently viewing कोकणच्या विकासाला अर्थसंकल्पाची मोठी गती! वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी ३२४४ कोटींची तरतूद
oplus_2097152

कोकणच्या विकासाला अर्थसंकल्पाची मोठी गती! वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी ३२४४ कोटींची तरतूद

मच्छीमार, नारळ, काजू, फळबागा आणि पर्यटन क्षेत्राला चालना; २०२८ पर्यंत रेल्वे प्रकल्प पूर्ण होणार – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली :

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोकणच्या अर्थकारणाला भक्कम चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्ग साकारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ६५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ३२४४ कोटींची तरतूद केली असून उर्वरित ५० टक्के निधी राज्य सरकार देणार असल्याची माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

कणकवलीतील ओमगणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून सादर झालेल्या अर्थसंकल्पात कोकण व विशेषतः सिंधुदुर्गच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून कोकणसाठी कसा निधी आणला जातो, हे स्पष्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या अर्थसंकल्पात कोकणच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या मच्छीमार, नारळ, काजू आणि फळ उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ५०० नवीन तलावांची तरतूद करण्यात आली आहे. किनारपट्टी भागात स्टार्टअप, महिला बचतगट आणि मत्स्य उत्पादक शेतकरी संघटनांची साखळी बळकट केली जाणार आहे. खोल समुद्रातील मासेमारीस करमुक्त दर्जा देऊन निर्यातीस चालना देण्याचा निर्णयही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकणातील फळ उत्पादनाला ‘व्हॅल्यू क्रॉप’चा दर्जा देण्यात आल्याने शेती क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. नारळ उत्पादनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी संधी असून, नारळ संवर्धन व प्रोत्साहन योजना आणण्यात आली आहे. तसेच काजूला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रीमियम ब्रँडमध्ये रूपांतर करण्याचा निर्णयही अर्थसंकल्पात घेण्यात आला असल्याचे श्री. राणे म्हणाले.

वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्गाबाबत भूसंपादनाची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली असून, कालच्या अर्थसंकल्पामुळे या प्रकल्पाला मोठी गती मिळणार आहे. २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पूर्ण अधिकार व स्वातंत्र्य दिल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया अधिक वेगाने राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अर्थसंकल्पात बंदर विकास, जहाज बांधणी आणि सी-प्लेन योजनेसाठीही तरतूद करण्यात आली असून, याचा थेट फायदा कोकणातील पर्यटनाला होणार आहे. स्वदेशी सी-प्लेन निर्मितीमुळे प्रवास सुलभ होईलच, शिवाय दुर्गम भागातील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल, असे श्री. राणे म्हणाले.

केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेचा फायदा पहिल्याच वर्षात दिसून येत असून, पुढील चार वर्षांत कोकणचा सर्वांगीण कायापालट झालेला निश्चित दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा