You are currently viewing कुडाळात उद्या महायुतीची भव्य जाहीर सभा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार उपस्थित

कुडाळात उद्या महायुतीची भव्य जाहीर सभा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार उपस्थित

निवडणूक प्रचार शिगेला; आमदार निलेश राणे यांनी घेतली सभास्थळाची पाहणी

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या, मंगळवारी दुपारी ३ वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज सायंकाळी स्वतः सभास्थळी भेट देऊन पाहणी केली. सभेचे नियोजन अत्यंत चोख ठेवण्यात आले असून, मैदानावर भव्य व्यासपीठ तसेच कार्यकर्त्यांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात येत आहे.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सुरक्षा उपाययोजना, सभेचे एकूण नियोजन व व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती घेतली. कुडाळ व मालवण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या सभेसाठी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही जाहीर सभा महायुतीच्या उमेदवारांसाठी विजयाचा मार्ग अधिक सुलभ करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या पाहणीकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, काका कुडाळकर,संपर्क प्रमुख नगरसेवक ठाणे राजेश मोरे, अभिषेक गावडे, साईनाथ महाडदळकर,चेतन पडते, आबा धडाम, देवेंद्र नाईक, रोहित भोगटे, राजवीर पाटील,ऍड राजीव कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा