शौर्य जागृती कार्यक्रमांनी गडावर जागल्या जाज्वल्य इतिहासाच्या आठवणी…
वेंगुर्ले
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रेडी येथील यशवंत गडावर शिवप्रेमीं कडून जलोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील लहान मुले, महिला, वृध्द, सर्व शिवप्रेमी तसेच शिवप्रेमी संघटना उपस्थित सहभागी झाल्या होत्या.
शिवप्रेमी एकोप्याने गेले काही वर्षे या यशवंत गडाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक आठवड्याला येथे स्वच्छता मोहीम राबवून गड संवर्धनाचे मोलाचे कार्य करीत आहेत. या साऱ्या शिवप्रेमी मावळ्यांनी सहभागी अन्य संस्था व नागरिकांच्या सहकार्याने आज मोठ्या दिमाखात शिवजयंती उत्सव साजरा केला. येथे सादर झालेल्या शौर्य जागृती कार्यक्रमांनी गडावर आज पुन्हा एकदा जाज्वल्य इतिहासाच्या आठवणी जागृत झाल्या.
सकाळी शिरोडा ते रेडी ग्रामपंचायत पर्यंत शिवप्रेमींची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर रेडी ग्रामपंचायत पासून पुढे ऐतिहासिक यशवंत गडा पर्यंत पायी चालत पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी ढोल ताशा पथक व बँजो पथक विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते. या पालखी सोहळ्यात शिवस्फुर्ती जागवणारी गीते वाजवली जात असल्याने एकूणच वातावरण शिवमय झाले होते. कार्यक्रमा दरम्यान पालखी गडावर पोहचल्या नंतर गडावर श्री बागलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी “आजचे हिंदुत्व” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनतर सागरी जीव रक्षक, चित्ररथ मधील सहभागी शिवप्रेमी, गड संवर्धन करणाऱ्या सर्व शिवप्रेमी संघटना यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच शिवप्रेमींनी खुप परिश्रम घेतले.