मालवण / आचरे:
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये नं.१ शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीम. रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवणचा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार नुकताच साने गुरुजी सभागृह न्यू इंग्लिश स्कूल, आचरे येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी जॅकारिएस फर्नांडिस (अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटी आचरे), प्रमुख अतिथी म्हणून अंकुशराव घुटुगडे, (मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल आचरे), सुरेश गावकर, (अध्यक्ष निवड समिती), सदानंद कांबळी (ज्येष्ठ सल्लागार साने गुरुजी कथामाला मालवण), ज्ञानदेव तेली (मुख्याध्यापक ओवळीये नं.१), राजेंद्र तेंडोलकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कथामाला अहवाल आणि पुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत पांडुरंग कोचरेकर यांनी केले. मागील सेवामयी पुरस्कार प्राप्त शिक्षक देवयानी आजगावकर, श्रुती गोगटे, परशुराम गुरव, गुरुनाथ ताम्हणकर यांचे स्वागत सुरेंद्र सकपाळ यांनी केले.
दीपप्रज्वलन बाबाजी भिसळे, प्रकाश पेडणेकर, अशोक कांबळी, सुरेश ठाकूर, सुगंधा गुरव, सुरेंद्र सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. मनाली फाटक यांनी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सादर केली.
सत्कारमूर्ती रसिका तेंडोलकर यांना कथामालेच्या वतीने शाल, श्रीफळ, ग्रंथभेट, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख ५०००रु. पारितोषिक कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मानपत्राचे वाचन अनघा कदम यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानदेव तेली, शंकर गोसावी, अस्मिता ठाकूर या शिक्षकांचे तसेच वनिता घाडीगावकर (पोषण आहार सहाय्यक), गायत्री गावकर (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) यांचा कथामाला मालवणच्या वतीने ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
“कथामालेचा पुरस्कार हा आयुष्यातील मानाचा पुरस्कार असून या पुरस्काराचा सन्मान राखला जाईल असे मुलांसाठी कार्य यापुढे करण्याची प्रेरणा मिळेल,” अशी भावना सत्कारमूर्ती तेंडोलकर यांनी व्यक्त केली.
“कथामालेचे सर्वच उपक्रम हे विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणादायी असतात. या पुरस्कार सोहळ्यात सेवेचे महत्त्व दिसून येते,” असे उद्गार मुख्याध्यापक श्री. घुटुगडे यांनी काढले. यावेळी सुरेश गावकर, ज्ञानदेव तेली यांनी समायोचित भाषणे केली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री. फर्नांडिस म्हणाले, “कै. जी. टी. गावकर यांनी आचरे सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण पूर्ण करून शिक्षकांसाठी आणि समाजासाठी आदर्शवत काम केले. त्यांच्या कार्याची आठवण कथामाला मालवणने ठेवली असून ते कार्य आपल्या सदस्यांकडून करून घेत आहे याचा आनंद वाटतो.”
साने गुरुजी कथामालेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कथामाला अंकाचे प्रकाशन सदानंद कांबळी सर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला अनिरुद्ध आचरेकर, सायली परब, रमाकांत शेट्ये, माधव गावकर, चंद्रशेखर धानजी, उज्ज्वला धानजी, त्र्यंबक आजगावकर, संजय परब, कामिनी ढेकणे, छाया त्रिंबककर, मृणालिनी आचरेकर, चंद्रकला दिवेकर, स्मिता जोशी, अमृता मांजरेकर, मधुरा माणगावकर, नेहा बापट आणि कथामाला सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला वैजयंती करंदीकर, उज्ज्वला महाजन, अर्चना कोदे, एकनाथ गायकवाड, दिपक पारकर आदी कथामालेचे मालवण, कणकवली, देवगड येथील ७५ घ्या वर कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी तर आभार प्रदर्शन परशुराम गुरव यांनी केले.
