You are currently viewing फोंडाघाटमध्ये महायुतीचा रणसंग्राम; मामा हळदिवे व पंचायत समिती उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन
Oplus_16908288

फोंडाघाटमध्ये महायुतीचा रणसंग्राम; मामा हळदिवे व पंचायत समिती उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन

नितेश राणे यांचा निर्धार; नारायण राणे यांचा विश्वास सार्थकी लावण्याचे आवाहन

कणकवली / फोंडाघाट :

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकतर्फी होत चालली असून महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रचारातही दिसत नसल्याने ही निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सहज जिंकली जाईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. फोंडाघाट–घोणसरी येथे झालेल्या महायुतीच्या जंगी सभेत ते बोलत होते.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “गेली २७ वर्षे जिल्हा परिषद खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि पुढील पाच वर्षेही तशीच राहील. जिल्ह्याचा विकास महायुतीच करू शकते. निवडणुकीनंतर निधीसाठी पुन्हा आमच्याचकडे यावे लागणार आहे. त्यामुळे जिथे ‘कमळ’ तिथे आम्ही—हे लक्षात ठेवा.”

जिल्हा परिषद फोंडाघाट व पंचायत समिती लोरेच्या घोणसरी आणि फोंडाघाट येथे ही सभा पार पडली. यावेळी उमेदवार सदानंद उर्फ मामा हळदिवे, मानसी मराठे, पवन भालेकर यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

फोंडा मतदारसंघ शिवसेनेने मागितला असून १९९० पासून मामा हळदिवे खासदार नारायण राणे यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत. “फोंडा मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही. केंद्र, राज्य आणि जिल्हा—सर्वत्र महायुतीचे सरकार आहे. राणे कधी अर्धवट काम करत नाहीत; जिथे असतात तिथे शंभर टक्के असतात,” असेही नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले.

सभेला माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, संतोष कानडे, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, तालुकाप्रमुख दामू सावंत, माजी सरपंच राजू रावराणे, अजय रावराणे, सुजाता हळदिवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मामा हळदिवेंचे भावनिक आवाहन

महायुतीचे उमेदवार सदानंद उर्फ बबन (मामा) हळदिवे म्हणाले, “आजपर्यंत मी खासदार नारायण राणे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलो. जनतेच्या सेवेसाठी माझा व माझ्या कुटुंबाचा संपूर्ण प्रवास समर्पित आहे. माझी उमेदवारी ही तुमची—जनतेची उमेदवारी आहे. वहिवर लिहिलेले खोडता येते, पण हृदयात कोरलेले कधीही खोडता येत नाही.”

नेत्यांचा विश्वास

शिवसेना उपनेते संजय आंग्रे म्हणाले, “दादा जो देतील तो उमेदवार आणि सांगतील तो सभापती होईल. बबन हळदिवे तळागाळात रुजलेले नेते आहेत; राणे साहेबांनी दिलेली जबाबदारी ते निश्चित पार पाडतील.”

माजी आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले की, “खासदार नारायण राणे यांनी विकासाचा धडा घालून दिला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी या मतदारसंघावर घट्ट पकड निर्माण केली आहे. धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोर बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या; फोंडाघाट–घोणसरी परिसर सुजलाम–सुफलाम होईल.”

प्रतिक्रिया व्यक्त करा