You are currently viewing पक्षविरोधी कारवाई : भाजप जिल्हाध्यक्ष सावंतांकडून २३ पदाधिकारी, कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित

पक्षविरोधी कारवाई : भाजप जिल्हाध्यक्ष सावंतांकडून २३ पदाधिकारी, कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित

ओरोस :

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणे किंवा विरोधी उमेदवारांना मदत केल्याच्या आरोपावरून भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कडक पावले उचलली आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून भाजपच्या २३ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती असून जिल्हा परिषदेत भाजप ३१ तर शिवसेना १९ जागांवर, तर पंचायत समितीत भाजप ६३ आणि शिवसेना ३७ जागांवर लढत आहे. मात्र अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत असून काहींनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे.

जिल्हाध्यक्ष सावंत यांनी केलेल्या कारवाईत जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, नेरूर–देऊळवाडा येथे शिवसेना उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेले रूपेश पावसकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना किनळेकर, कोलगाव मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणारे डायगो (मायकल) डिसोझा, तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शर्वाणी गावकर आदींचा प्रमुखाने समावेश आहे.

याशिवाय निलंबितांमध्ये राजन चिके (फोंडा, ता. कणकवली), सुजाता पडवळ, (तुळस ता. वेंगुर्ला), विजय रेडकर, (मातोड ता. वेंगुर्ला), जनार्दन कुडाळकर, (आडेली ता. वेंगुर्ला), जितेंद्र गावकर,(माजगाव ता. सावंतवाडी), योगेश केणी, (इन्सुली ता. सावंतवाडी), स्वागत नाटेकर, (इन्सुली ता. सावंतवाडी), नितीन राऊळ, (इन्सुली ता. सावंतवाडी), उल्हास परब, (सातार्डा ता. सावंतवाडी), स्नेहल नेमळेकर, (आरोंदा ता. सावंतवाडी), साक्षी नाईक,(ता. दोडामार्ग), सप्रिया नाईक (ता. दोडामार्ग), सुनीता भिसे (ता. दोडामार्ग), प्रविण गवस (ता. दोडामार्ग), अनिरुद्ध फाटक (ता. दोडामार्ग), सोश्मिता बांबर्डेकर, (ओरोस ता. कुडाळ), योगेश तावडे, (ओरोस ता. कुडाळ), विजय नाईक, (आडेली ता. वेंगुर्ला) यांचा समावेश आहे.

पक्षशिस्तीचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही कारवाई केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा