बारामती :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. काल बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी बारामतीत पवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
स्व. अजितदादांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर असंख्य कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. राणे कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे नाते हे राजकारणापलीकडचे, आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे असल्याचे सांगत, ही वेदना शब्दांत मांडणे अशक्य असल्याचे आमदार निलेश राणे यांनी नमूद केले.
स्व. अजितदादा हे केवळ एक प्रभावी नेते नव्हते, तर दिवसरात्र जनतेसाठी झटणारे, कामातून आपली ओळख निर्माण करणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांसह आम्हा सर्वांसाठी निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पवार कुटुंबीयांना धीर दिला. ईश्वर स्व. अजितदादांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि पवार कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
