आडेली जि.प. मतदारसंघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे
वेंगुर्ले :
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पक्षातील शिस्त आणि नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित करत नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारी माघार घेतली आहे. पक्षाचा सच्चा कार्यकर्ता या नात्याने संघटना मजबूत ठेवणे व पक्षहित जपणे हेच आपले कर्तव्य असल्याचे मनीष दळवी यांनी स्पष्ट केले.
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघातून एकूण दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनीष दळवी यांच्यासह आप्पा गावडे, विष्णू खानोलकर, ललित कुमारठाकूर, जनार्दन कुडाळकर, ओंकार नाईक आणि नित्यानंद शेणई यांनी आपले अर्ज माघारी घेतले.
या घडामोडीनंतर आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात आता समिधा नाईक, उबाठा शिवसेनेचे विजय नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सखाराम उर्फ दादा सारंग यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेमुळे निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून, येथील सामना अधिक चुरशीचा ठरण्याची चिन्हे आहेत.
