मनीष दळवींचा अर्ज मागे; निवडणूक रंगणार तिहेरी लढतीत
वेंगुर्ले :
आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. भाजपचे अधिकृत उमेदवार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांना महायुतीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघातून एकूण दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मनीष दळवी यांच्यासह आप्पा गावडे, विष्णू खानोलकर, ललित कुमारठाकर, जनार्दन कुडाळकर, ओंकार नाईक आणि नित्यानंद शेणई यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
दरम्यान, या मतदारसंघात आता समिधा नाईक, उबाठा शिवसेनेचे विजय नाईक तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सखाराम ऊर्फ दादा सारंग यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
