अपक्ष उमेदवारीला माघार; कणकवलीत कानडेंच्या भूमिकेची राजकीय चर्चा
कणकवली :
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरील पोस्टर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. “काल, आज, उद्याही नितेश साहेबांसोबत…” असा आशय असलेला हा स्टेटस सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
फोंडाघाट आणि हरकुळ खुर्द पंचायत समिती मतदारसंघासाठी संतोष कानडे यांनी यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी या दोन्ही ठिकाणच्या अपक्ष उमेदवारी अर्जांना माघार घेतली आहे.
कानडे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबतचे फोटो असून,
“दाखवाल ती दिशा…
सांगाल तो मार्ग…
द्याल ती जबाबदारी…
शब्द ही भावना होती,
निष्ठा ही श्रद्धा आहे.
काल, आज, उद्याही नितेश साहेबांसोबत…”
असा भावनिक मजकूर झळकत आहे.
या स्टेटसमुळे संतोष कानडे यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात असून, अपक्ष उमेदवारी मागे घेतल्यानंतर कणकवली तालुक्यात राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
