करम तेरे अच्छे है तो
किस्मत तेरी दासी है ,
नियत तेरी साफ है तो
घर में मथुरा कासी है !
अशा थोर संत कबीर दास यांच्या अनमोल विचारधनांचा प्रत्यक्षात अनुभव यावा ,अशी आपल्या प्रामाणिक सेवाभावी कामातून सत्य , प्रामाणिकपणा आणि चांगुलपणावरचा विश्वास अधिक दृढ करणारी माणसं आजही आपल्या अवतीभवती बघायला मिळतात.म्हणूनच लाडीलबाडी , फसवणूक आणि चुकीच्या पध्दतीने वागून अविश्वासाचे वातावरण निर्माण झालेल्या आजच्या काळात असा प्रामाणिकपणा ,सच्चेपणा अधिक उठून दिसतो आणि सत्याचा मार्ग हा आपलं आयुष्य अधिक समृद्ध व परिपूर्ण करणारा असतो ,यावरची श्रध्दा अधिक दृढ होऊन कृतार्थ जगण्याची आशा अधिक पल्लवीत होते.याचेच आदर्श व
जीवंत उदाहरण म्हणजे उच्च शिक्षित असूनही इचलकरंजी शहरातील आयडीबीआय बॅंकेत अगदी सेवाभावी वृत्तीने प्रामाणिकपणे
सुरक्षा रक्षकाची नोकरी करणारे आदरणीय भरत जाधव साहेब यांच्या श्रमप्रतिष्ठा वाढवणा-या कर्तव्यनिष्ठेकडे पहावे लागेल.मुडशिंगी (ता.हातकणंगले) येथील कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू असलेले भरत जाधव साहेब (मो.9921094862) यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असूनही केवळ शिक्षणावरच्या प्रेमापोटी त्यांनी मिळेल ती कामे करत करत मोठ्या जिद्दीने परिस्थितीशी झुंज देत आपले बी.ए.पदवी आणि त्यानंतरचे बी.पी.एड पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.पण , त्यानंतर क्रीडा शिक्षकाची नोकरी मिळावी , यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला.पण ,शेवटी पदरात निराशाच पडली.पण ,मनानं खचून न जाता वाट्याला आलेल्या संकटाशी दोन हात करत कोणत्याही कामाची लाज न बाळगता त्यांनी २००३ साली इचलकरंजी शहरात युनायटेड बॅंकेत अगदी तुटपुंज्या पगारावर सुरक्षा रक्षकाची नोकरी स्विकारली. ही नोकरी करत असताना त्यांनी कधीच सत्य , प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती यावरची अतूट श्रध्दा आणि विश्वास ढळू दिला नाही.मधल्या काळात युनायटेड बँक अन्यञ स्थलांतरित झाली आणि त्याच जागेत आयडीबीआय बॅंकेची शाखा सुरु झाल्याने त्यांना तिथेच आपली नोकरी सुरु ठेवण्याची संधी मिळाली.या काळात त्यांनी बॅंकेतील सर्व आर्थिक व्यवहार आणि येणाऱ्या,जाणाऱ्या ग्राहकांवर कटाक्षाने लक्ष ठेवत , ग्राहकांना बॅंकींग कामात येणाऱ्या अनेक अडचणी सोडवून त्यांना चांगली प्रामाणिक सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यामुळेच बॅंकेचे अधिकारी , कर्मचारी यांच्यावरचा अतिरिक्त कामाचा ताण कमी होण्यास मोठी मदत होत आहे. याशिवाय शांत, प्रेमळ स्वभाव आणि मदतीच्या कार्यतत्परमुळे त्यांचे बॅंकेच्या ग्राहकांशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध झाले आहेत.गेल्या २३ वर्षाच्या काळात त्यांनी काही वेळेस अन्य शाखेत बदली झाली होती, पण अधिका-यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांना याच शाखेत बोलावून घेतले आहे.यावरुन त्यांचा कामातील प्रामाणिकपणा आणि विश्वास दिसून येतोच, याशिवाय अधिकारी, कर्मचारी आणि सर्वांशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत,हे देखील दिसून येते.
अगदी सुरुवातीच्या काळात त्यांना अगदी तुटपुंजा पगार असल्याने ते मुडशिंगीहून सायकलनेच नोकरीसाठी ये – जा करायचे.पण , तरीही त्यांनी कामावरची निष्ठा कधीच ढळू दिली नाही.घरची काहीच शेती नसल्याने घराच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना त्यांची पत्नी शिलाई काम करुन मिळणाऱ्या कमाईतून मोठा हातभार लावते.त्याचा त्यांच्या दोन्ही मुलांच्या इंजिनिअरिंग शिक्षणाचा खर्च भागवण्यात मोठा हातभार लागत आहे.भरत जाधव साहेब हे स्वतः उच्च शिक्षित आहेत.त्यात त्यांची पत्नी देखील शिक्षणाला महत्त्व देणारी असल्याने आपला मुलगा आणि मुलगी या दोघांनीही घरच्या आर्थिक अडचणींचा विचार न करता फक्त शिकत रहावे , यासाठी त्या नेहमीच दक्ष असतात.म्हणूनच तर त्यांचा मुलगा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींग पदवीचे शिक्षण आणि मुलगी काॅम्प्युटर इंजिनिअरींग डिप्लोमाचे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.एकंदरीत ,उच्च शिक्षित असूनही अपेक्षाप्रमाणे नोकरी मिळाली नाही म्हणून हताश न होता भरत जाधव साहेब यांनी बॅंकेत सुरक्षा रक्षकाची नोकरी स्विकारुन त्यातून आपल्या स्वतःबरोबरच कुटूंबातील सर्वांचे स्वप्न साकार करण्यासाठी अगदी प्रामाणिकपणे सेवाभावी वृत्तीने आपला कर्तव्यनिष्ठा जपण्याचा अविरत प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यांच्या प्रामाणिक सेवाभावी वृत्तीतून सुसंस्कारातील खरा सुशिक्षितपणा आणि श्रमाची प्रतिष्ठा कशी असते ,याचेच पवित्र दर्शन झाल्याखेरीज रहात नाही. म्हणूनच,
जो करी कर्म अहेतू
वेद तयास कळो न कळो रे ,
ओळख पटली ज्यास स्वतःची
देव तयास मिळो न मिळो रे !
या ओळींचा अर्थ एका कर्मयोग्याप्रमाणे आपले हातचे काम म्हणजे देवाचीच पूजा अशा भक्तीभावाने पार पाडणा-या भरत जाधव साहेब यांच्या प्रामाणिक सेवाभावी कामातून मनाला कळत राहतो.त्यांच्या ग्राहक देवो भव आणि सच्चे माणूसपण जपणाऱ्या कार्याला मनापासून सलाम…त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच देवाकडे मनोभावे प्रार्थना !
– सागर बाणदार
