You are currently viewing माझी माझ्या देशाशी एकनिष्ठता…
Oplus_16908288

माझी माझ्या देशाशी एकनिष्ठता…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी माझ्या देशाशी एकनिष्ठता..*

 

आधी आपण एकनिष्ठता म्हणजे काय? ते पाहू.

एकनिष्ठता म्हणजे, व्यक्तीशी, कुटुंबाशी, समाजाशी, राष्ट्राशी प्रामाणिक रहाणे.चांगल्या

गोष्टींचा निश्चय ढळू न देणे. उदा. पती पत्नीने

एकमेकांशी एकनिष्ठ रहाणे. तसेच कुटुंबातील व्यक्तींचे वर्तनही एकमेकांशी सुसंगत, प्रामाणिक व पारदर्शी असावे. तीच गोष्ट सामाजिक संबंध जपतांना आपण केली पाहिजे.

शेवटी समाज हा व्यक्तींनी बनलेला समुह असतो. या समाजात वावरतांनाही आपण सचोटीचे सारे नियम पाळणे आवश्यक आहे.

मग सामाजिक संबंधांना बाधा येत नाही.

 

आणि सर्वात महत्वाची आहे ती राष्ट्रनिष्ठा. हो, इथे आपली जबाबदारी खूप वाढते. त्या देशातील

लोकांच्या वर्तनानेच राष्ट्राचे भवितव्य घडते. त्या देशातील लोक देशावर किती प्रेम करतात, त्यांना

आपल्या देशाचा किती अभिमान आहे यावरच त्या देशाचे अस्तित्व टिकून असते. एक उदा. देते.

जालियनवाला बाग हत्याकांड झाले त्यावेळी

जमावावर गोळीबार करणारे सैनिक कोण होते?

आपल्या भारतीय बांधवांवर अंदाधुंद गोळीबार

करणारे आपले भारतीय सैनिकच होते. त्यांनी जर त्यावेळी जनरल डायरच्या दिशेने बंदुका वळवल्या असत्या तर काय बिघडले असते?मग

ब्रिटिशांनाही भारतीयांची अस्मिता पाहून त्यांना

कामावर ठेवायचे की नाही याचा विचार करावा

लागला असता. एरव्ही एव्हढी मॅनपावर ते इंग्लंड

मधून थोडीच आणू शकत होते?

 

ब्रिटिशांची चाकरी करणारे हे भारतीय मनाने ब्रिटिशांचे गुलाम झाले होते. त्यांची राष्ट्रनिष्ठा

हरवली होती, इतकी की आपल्या भारतीय बांधवांवर गोळीबार करतांना आपण भारताचे

लोक आहोत हे ही ते विसरले होते. त्यांनी जर

जनरल डायरच्या दिशेने बंदुका वळवल्या असत्या तर..,? इतके लोक

मृत्यूच्या दाढेत गेले नसते. जनरल डायर थोडा

का होईना दचकला असताच ना? ते भारतीयांनाच भारतीयांविरुद्ध वापरत होते.मी

असे वाचले आहे की, त्यामुळे जपानी लोक

भारतीयांचा तिरस्कार करतात.ते म्हणतात, तुम्हाला तुमच्या देशाचा अभिमानच नाही. आणि

बऱ्याच अंशी ते खरे आहे.जपानी महिला रेल्वेत

सीट फाटलेले दिसताच पर्समधून सुईदोरा काढून

ते लगेच शिवते व आपण ते सीट अधिक फाडून

त्यातला फोम घरी घेऊन जातो. हा एवढा मोठ्ठा

फरक त्यांच्या व आपल्या राष्ट्रनिष्ठेत आहे.

 

अहो, राष्ट्रनिष्ठा दाखवणे म्हणजे काही सीमेवर

जाऊन लढणे नव्हे. ते काम आपले जवान चोख

करतात. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतूनही

राष्ट्रनिष्ठा दिसते.राष्ट्रनिष्ठा म्हणजे सार्वत्रिक

बंधुभावना, सामाजिक ऐक्य टिकवणे,धार्मिक तेढ वाढेल असे कोणतेही वर्तन न करणे.या अपप्रवृत्तींपासून सदैव दूर राहणे म्हणजे राष्ट्रनिष्ठा.म्हणूनच आपण शाळेत प्रतिज्ञा म्हणतो. आमदार खासदार मंत्री न्यायाधीश यांना

राष्ट्रनिष्ठेची शपथ घ्यावी लागते.पण ती आपण

कितपत पाळतो हा संशोधनाचा विषय ठरावा.

 

राज्यघटनेशी एकनिष्ठ राहीन अशी शपथ घेणे

म्हणजे मी राज्याशी व राष्ट्राशी एकनिष्ठ राहीन.

राज्याच्या, राष्ट्राच्या हिताला बाधा येईल असे वर्तन चुकूनही माझ्याकडून घडणार नाही याची हमी देणे व तसे वर्तन करणे म्हणजे राष्ट्रनिष्ठा.

आपल्याला प्रबळ भावनिक ऐक्याने राष्ट्र घडवायचे असते. आपली संस्कृती खूप जुनी व

महान आहे. वैदिक काळापासून अनेक साम्राज्ये,

राजेशाह्या निर्माण झाल्या व लयाला गेल्या. रामकृष्ण ही आले गेले पण आपले राष्ट्र कायम

राहिले. सिकंदर आला.भारतातल्या गुप्त मौर्य

घराण्यांनी अतुल पराक्रम केला. चाणक्यनीतिही

आपल्याला माहित आहेच.भारतीयांनी अनेक

आक्रमणे यशस्वी रित्या परतवून लावली. हे त्यांच्या जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेचेच उदा. नाही का?

नक्कीच. शक हूण अफगाण इथून कितीतरी

मुगलांसहित आलेल्या आक्रमणांचा पृथ्वीराज

चव्हाण व राणाप्रताप यांनी जोमाने प्रतिकार

करून भारताची अस्मिता टिकवून ठेवली व कळस म्हणजे, शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची

स्थापना करून भारतभर एकछत्री साम्राज्य उभे

करून रयतेचा राजा म्हणून प्रजेची काळजी घेतली. शिवरायांचे मावळे हे ज्वलंत राष्ट्रनिष्ठेचे

प्रतिक आहे.लोकांच्या राष्ट्राप्रती असलेल्या निष्ठेवरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. देश

हे आपले घर आहे असे समजून काम केले पाहिजे. आपण घर स्वच्छ ठेवतो, त्याची डागडुजी करतो, त्याची काळजी घेतो, तशीच काळजी,

आपण देशाची घेतली की झाले. प्रत्येक बाबतीत

देशाचा विचार करायचा. मी लाचखोर, भ्रष्ट, लबाड, कामचोर आहे का? मग मी देशाला भार

आहे. माझा देशाला काही उपयोग नाही. मात्र

देशाने दिलेल्या सर्व सवलती मात्र मी उपभोगतो.

याची माणसाला लाज वाटली पाहिजे. जो देश

माझे संरक्षण करतो त्यांप्रती माझी कर्तव्ये आहेतच की. ती मी विसरून कसे चालेल?

 

राष्ट्रभावना जपतांना काही मुल्ये पाळली गेली

पाहिजेत. उदा. समानता. होय,आपण सारे समान आहोत. या ब्रह्माडांत आपली पृथ्वी आहे व त्यावर आपला भारत देश आहे.त्याचे अस्तित्व

अनंत काळापासून स्वयंभू आहे.या विश्वात माणूस ही देवाने निर्मिलेली सर्वोत्कृष्ट कृती आहे व सर्व विश्वात तो सारखाच आहे. जे विश्वात आहे ते माणसात आहे व जे माणसात आहे तेच

विश्वात आहे. माणूस तिथून सारखाच म्हणून

हे समत्व आपण जपले पाहिजे.आणि तेच आपल्या राष्ट्र निष्ठेचे गमक असले पाहिजे.

“सत्यमेव जयते” हे आपले ब्रीदवाक्य व अहिंसा

परमोधर्म: हे जीवाचे महत्व जाणणारे तत्व आपण

अंगिकारले आहे. आणि हे आचरणात आणणे

राष्ट्रप्रेमाचेच लक्षण आहे. अहिंसा व समभाव ह्या

दोन गोष्टी पाळल्या तरी अनेक प्रश्न सुटतात व

भेदाभेद निर्माण होत नाही. देशात शांतता नांदते.

दया क्षमा शांती व सत्यमेव जयते ही आपली ब्रीदवाक्ये बनली पाहिजेत.प्रत्येक व्यक्तीचे जीवन अमूल्य आहे.प्रत्येकाला आपल्या आपल्या आवडीप्रमाणे व आपल्या क्षमतेनुसार

जगण्याचा अधिकार आहे.राष्ट्राला बांधून ठेवण्याचे काम राष्ट्राची संस्कृती करते. या बाबतीत भारताची बरोबरी कोणताही देश करू

शकत नाही कारण भारताची संस्कृती फार

प्राचिन आहे. तिला ऋषीमुनींचा प्रचंड वारसा

होता व आजही आहे.भारत शस्त्रधारी राष्ट्र नाही,

तर ते शास्त्रधारी राष्ट्र आहे.आमचे शास्त्र हे मानवतेचे व मानवविकासाचे आहे.त्यामुळे भारत

पूर्ण विश्वात वेगळा व वैशिट्यपूर्ण आहे. त्याच्या

सारखा तोच आहे. म्हणून अशा राष्ट्रात आपण

रहातो याचा अभिमान आमच्या नसानसातून

उसळला पाहिजे.अशा या देशाशी निष्ठा राखणे

आम्ही आमचा धर्मच मानला पाहिजे.आपले नियोजित कर्म व देशाप्रती निष्ठा हे दोन्ही आमचे

धर्मच आहेत व ते निष्ठेने आम्ही पाळले पाहिजेत.

 

जयहिंद… जय महाराष्ट्र…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा