जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धा प्रदर्शनाचे उद्घाटन
कणकवली
इको फ्रेंडली गणेशमूर्तींच्या निर्मितीतून वर्षभरात 250 दिवस काम मिळत असेल तर निश्चितच पर्यावरणपूरक कामातून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. हा उद्देश नजरेसमोर ठेवून सिंधुदुर्ग बँक जिल्ह्यातील गणेशमूर्तीकारांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांच्या प्रयत्नातून येत्या काळात सिंधुदुर्ग इको फ्रेंंडली गणेशमूर्तींचे केंद्र बनेल आाणि देश-विदेशात सिंधुदुर्गातून गणेशमूर्ती जातील तो खरा आनंदाचा दिवस असेल असा विश्वास सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला.
श्री गणेश मूर्तीकार संघ सिंधुदुर्ग, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सतीश सावंत बोलत होते. स्पर्धा प्रदर्शनाचे उद्घाटन कमलमठमधील ज्येष्ठ मूर्तीकार सदानंद आमडोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई, भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, मूर्तीकार संघाचे जिल्हाध्यक्ष बापू सावंत, ज्येष्ठ मूर्तीकार विलास मळगावकर, मुंबई मूर्तीकार संघाचे अध्यक्ष वसंत राजे, उदय राऊत, मूर्तीकारांचे प्रतिनिधी प्रा. प्रसाद राणे, प्रा.शंकर राणे तसेच सिंधुदुर्गच्या विविध भागातून आलेले मूर्तीकार उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये 89 गणेशमूर्तीकारांनी सहभाग घेतला आहे. असलदे येथील दिविजा वृध्दाश्रममधील वृध्दांनी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करून स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तर सावंतवाडी-मळगाव येथील विलास मळगावकर यांनी गोमय गणेश या नवीन संकल्पनेतून इकोफ्रेंडली गणेशमर्ती साकारल्या आहेत. डॉ. प्रसाद देवधर म्हणाले, सिंधुदुर्गात इकोफे्ंरंडली गणेशमूर्तींच्या निर्मितीमध्ये होणारे नवनवीन प्रयोग आशादायी आहेत. मूर्तीकाराला संसाराची भ्रांत असता नये तरच त्याच्यातील कलाकार जागा राहील. सिंधुदुर्गातील अशा प्रतिभावंत मूर्तीकारांना राजाश्रय देण्याचे काम सिंधुदुर्ग बँक करत आहे. त्यातून निश्चितीच मोठे काम उभे राहणार आहे, असा विश्वास डॉ. देवधर यांनी व्यक्त केला.
शेतकरी आणि बेरोजगारांबरोबरच समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग बँक प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून मूर्तीकारांना पाठबळ देण्याचा हा उपक्रम राबविला जात आहे.येत्या काळात समन्वयातून मोठे काम उभे करूया असा विश्वास सिंधुदुर्ग बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई यांनी व्यक्त केला. बापू सावंत म्हणाले, मूर्तीकारांच्या कलेचे आदान प्रदान व्हावे, त्याच्या कलेमध्ये भर पडावी. वर्षभर मूर्तीकाम सुरू ठेवताना आपला व्यवसाय वृध्दींगत व्हावा यासाठी जिल्हा मूर्तीकार संघ प्रयत्नशील आहे. सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष यांच्या पाठबळामुळे आणि भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांच्या मार्गदर्शनामुळे सिंधुदुर्गातील हे दुसरे इको फ्रेंडली गणेशमूर्ती प्रदर्शन यशस्वी होत आहे. 2019 मध्ये 77 तर या प्रदर्शनात 89 स्पर्धक मूर्तीकारांनी सहभाग घेतला आहे असे सांगितले. सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले.