“कितीही आपटा,जिल्हा परिषदेचे दादा,राणेच”
….अँड.नकुल पार्सॅकर…
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समितीच्या निवडणुकीचा शिमगा सुरू झाला.खरं तर शिमग्यात करमणूक असते.रोंबाट,खेळे,राधा’ कृष्ण वैगरे पारंपरिक रुढी,परंपरा पाळल्या जातात. मात्र यावेळच्या निवडणुकीत ना शिमगा ना रोंबाट.सगळे अगदी शांतपणे,निर्विवाद,एकतर्फीच होणार.२७ जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. कालची उमेदवारांची संख्या पहाता उदंड झाले बंडखोर,माञ हे बंडखोर सत्ताधारी पक्षाचेचं आहेत.कारणे काहीही असो पण भाजपातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपडतोय कारण यशाची शंभर टक्के खाञी.बंडखोरीत शिंदेसेनेपेक्षा भाजपा आघाडीवर आहे.
जिल्ह्यातील पक्षनिहाय ताकदीचे विश्लेषण केले तर सगळ्यात जास्त काळ देशावर राज्य केलेला जुना पक्ष काँग्रेस आता या जिल्ह्यात शेवटची घटका मोजत आहे.आदरणीय काका पुतण्यांचा पक्ष आता या जिल्ह्यात खिजगणतीत नाही.पवार साहेबांशी एकनिष्ठ असणारे हाताच्या बोटावर असणारे कार्यकर्ते हिच या पक्षाची थोडीफार जमेची बाजू.
ठाकरे सेवेबाबत बोलायचे झाल्यास काही प्रमाणात बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक अजूनही टिकून आहे.माजी आमदार वैभव नाईक हे या क्षणापर्यंत तरी मातोश्रीवर निष्ठा ठेवून ठाकरे सेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत करत आहेत. त्यानाही आता मर्यादा आहेत.
या निवडणुकीत काही तुरळक अपवाद वगळता भाजपा विरुद्ध शिंदेसेना व भाजपा विरुद्ध भाजपा असा सत्ताधाऱ्यां मध्येच सामना पहायला मिळेल. अशा लढतीमुळे कदाचित थोडीफार फायदा हा ठाकरे सेनेचा होवू शकतो.मात्र वैभव नाईक वगळता अशा संधीचा राजकीय फायदा आपल्या पक्षासाठी करून घेणारे सक्षम नेतृत्व उबाठा कडे नाही.
गेल्या आठ वर्षाहून जास्त काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने आपापल्या भागाच्या विकासाठी निवडणुकीची आतुरतेने वाट पहाणार्या अनेक विकासपुरुषानी या निवडणुकीत बहुसंख्येने सहभाग घेतला.यात बंडखोर अपक्षांची संख्या जास्त आहे.येत्या २७ तारखेला हे सत्ताधारी पक्षातील बंडखोर शांत झालेले असतील.काहिनां स्विकृतचे गाजर दाखवून काहिनां समित्यांचे अमीष दाखवून शांत केले जाईल.काहिना आणखी वेगळा फंडा वापरून गप्प केले जाईल,आणि समजा एवढे करून जर कुणी ऐकले नाही तर शेवटचा पर्याय म्हणजे या जिल्ह्याचे सर्वेसर्वा अर्थात आदरणीय दादा यांचा शब्द सहसा कुणीही पाडत नाही.जेव्हा या निवडणुकीची सर्व सुञ दादानी आपल्याच हातात घेतली तेव्हाच याचा निकालही निश्चित झाला.त्याना हे सगळे एकहाती करायचे आहे..यावरून मला साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आठवली.
मी पोस्टाच्या नोकरीचा राजीनामा दिला तेव्हा कणकवली नगरपंचायतीची निवडणूक लागली होती.तेव्हा सेनाभाजपा युती होती.विरोधीपक्ष नेते होते मा.दादा आणि कोकणचे भाजपाचे प्रभारी मा.विनोदजी तावडे.भाजपाचे तत्कालीन कोकण संघटन मंञी डॉक्टर अभय सावंत यानी मला सांगितले”पार्सॅकर तुम्ही कणकवलीत जावून आपल्या पक्षासाठी चार उमेदवार शोधा व त्याना तयार करा.मी सावंतच्या आदेशानुसार कणकवलीत लालपरीने गेलो.तेव्हा कणकवलीत भाजपाचे जेमतेम दहा कार्यकर्ते.जेष्ठ कार्यकर्तॅ श्री बाक्रे ,श्री झगडे ,सौ.भोसलबाई अशाना बरोबर घेऊन कसेबसे चार उमेदवार तयार केले. राञी हाॅटेल यशधरा येथे पोहचलो व डॉक्टर अभय सावंत याना फोन केला तर ते मला म्हणाले,” आताच मला विनोदजींचा फोन आला,त्यांचे आणि दादाचे बोलणे झाले की भाजपाने कोणीही उमेदवारी भरू नये,दादाना ही निवडणूक धनुष्यबाणावर एकहाती काढायची आहे” हे ऐकल्यावर मी सावंताना म्हणालो,ज्या चार जणांना मी तयार केले त्याना आता तुमचं समजवा.थोडक्यात दादांचा त्यावेळीही दरारा होता आणि आताही आहे.आता तर समोर एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या महायुतीच्या विरोधात लढणारा सक्षम विरोधीपक्षच नाही.देशपातळीवर आणि या जिल्ह्यातही इंडी आघाडीचे तीनतेरा वाजलेत.अंगात बळ नसले तरी बाह्या सरसावून स्वबळाची भाषा करतात आणि सपशेल तोंडावर पडतात.
यावेळची जि.प.व पंचायत समितीची निवडणूक ही एकतर्फीच होणार आणि जशी ती गेली पंचवीस वर्षाहून जास्त काळ नारायणराव राणेंच्याच ताब्यात होती तशीच राहाणार .यासाठी कुणाही भविष्याकाराने भविष्य सांगण्याची गरज नाही.
आठ पंचायती पैकी मालवण ,कुडाळ निलेश राणे,उर्वरित सहा पंचायती या पालकमंञी नितेश राणे.जिल्ह्या परिषदेत एखादे दुसरे पद हे शिंदे सेनेला बाकी सर्व भाजपाला.थोडक्यात या जिल्ह्याचे निर्विवाद मालक व चालक हे माननीय खासदार नारायणराव उर्फ सर्वांचे लाडके “दादा”
