You are currently viewing जखमा आणि उपचार

जखमा आणि उपचार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जखमा आणि उपचार*

 

कशास गोंजारावे जखमांना, का करावेत लाड

का घालावा मुखवटा हास्याचा, वेदनांच्या आड

स्वीकारून निचरा झाल्यावरती, जखमाही हसतात

ना तर अश्वस्थाम्यासम त्या, दारोदारी फिरतात

 

कोणी लावतं मलम, कोणी घालते फुंकर

काढून खपली कुणी चोळतं, मीठही त्यावर

शरीरावरील जखमा निदान, दृष्टीने दिसतात

योग्य औषधोपचाराने त्या, बऱ्याही करता येतात…

 

मनावरील जखमांना नेहमीच, औषध नसतं काळ

ठुसठुसण्यासाठी पुरेशी होते, आठवणींची माळ

शब्दच घालती घाव आणिक, शब्दच

कुरवाळतात

तात्पुरत्या, कधी कायमच्या व्रण ठेवून, जखमा बऱ्या होतात…

 

कधी आपणच आपल्या मनाचे, होत असतो वैरी

उपायही आपल्याच हाती, नसतो तो बाहेरी

अपराधी भावनांच्या पिंजऱ्यात, स्वतःच कैद होतात

सुटका करण्याचा दरवाजा स्वतःच बंद करतात….

 

आयुष्याच्या लढाईत स्वकीय/परकीय जखमा करणार

काही जखमा वेळेसोबत आणखी खोल होत जाणार

खोल जाणाऱ्या जखमांना सूज्ञ वेळीच अटकाव करतात

सकारात्मकतेने आयुष्य सावरून, स्व-पर क्षमाभाव ठेवतात.

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

 

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या आहे स्वाधीन आहेत.

________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा